आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे छावण्यांतील जनावरांत 25 टक्के घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे छावण्यांतील जनावराच्या संख्येमध्ये 25 टक्के घट आली आहे. वादळी पावसामुळे बहुतांश छावण्यांतील शेड गायब झाले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने परिसर चिखलमय बनला आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:हून पशुधन घरी घेऊन जात आहेत. दरम्यान, प्रशासनाने छावणीतील जनावरांची पाहणी सुरू केली आहे.

गेल्यावर्षी चार्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. जनावरे जगवण्यासाठी चारा डेपो सुरू करण्यात आले. नंतर केंद्र सरकारच्या धोरणानुसार चारा डेपो बंद करण्यात येऊन छावण्या सुरू करण्यात आल्या. राज्यात सर्वाधिक छावण्या नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आल्या. सध्या चारशेपेक्षा अधिक छावण्यांमधून पशुधनाला चारा पुरवण्यात येत आहे. चारा डेपो व छावण्यांवर प्रशासनाने दोनशे तीस कोटींपेक्षा अधिक खर्च केला आहे.


चारा डेपोमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप व माहितीच्या अधिकारात या आरोपांना बळकटी देणारे पुरावे मिळाल्याने प्रशासनाने छावण्यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेतली. दुसर्‍या तालुक्यातील पथकांच्या छावण्यांवर अचानक भेटी सुरू झाल्या. काही अपवाद वगळता छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी कमी झाल्या. मागील चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीसाठी छावण्यांमधून बैल घरी नेले आहेत. चिखलामुळे संसर्गजन्य आजाराची बाधा होण्याचा धोका लक्षात घेऊन दुभती जनावरे घरी हलवण्यात आली आहेत. चारच दिवसांच्या पावसामुळे छावण्यांमधील जनावरांमध्ये 25 टक्के घट आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता तलाठी, मंडलाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील छावण्यांची पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना केला आहे. इतर तालुक्यांतील भरारी पथकांकडूनही छावण्यांना अचानक भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे.


मुबलक चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या सुरू
मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मात्र, छावणी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. समाधानकारक पाऊस पडून मुबलक चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत छावण्या सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे चाराटंचाई असणार्‍या गावातील शेतकर्‍यांनी त्यांची जनावरे छावणीतच ठेवावी. टँकरची संख्याही कमी होत आहे.’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी.


चिखलामुळे छावण्यांची दैना
चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे छावण्यांत मोठय़ा प्रमाणात चिखल झाला असून पाणीही साचले आहे. काळ्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या छावण्यांची पावसामुळे अधिक दैना उडाली आहे. खडकाळ जागेवरील छावण्यांमध्ये ही समस्या नाही. तलाठी, मंडल अधिकारी व इतर तालुक्यांच्या पथकाकडून पाहणी सुरू आहे. ’’ संजय बडे, छावणीचालक.