आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दुनियादारी’ ने नगरमध्येही मोडला उत्पन्नाचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या वर्षभरात नगरमध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटापेक्षा जास्त गल्ला जमवला तो मराठमोळ्या ‘दुनियादारी’ चित्रपटाने! पहिल्या सात आठवड्यांत राज्यात 22 कोटींचे कोटींचे उत्पन्न मिळवलेल्या या चित्रपटाने नगरच्या एकट्या ‘माय सिनेमा’ मल्टिप्लेक्समध्ये 21 लाखांच्या पुढे मजल मारली.

नगरमध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारा चित्रपट म्हणून या वर्षी ‘दुनियादारी’ची नोंद झाली. एरवी हिंदी चित्रपटांना गर्दी करणारी कॉलेजमधील तरुणाई या चित्रपटासाठी अँडव्हान्स बुकिंग करू लागली. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी अलीकडे दुर्मिळ झालेला ‘हाऊसफुल्ल’चा फलक चित्रपटगृहांबाहेर झळकू लागला.

सावेडीत पाइपलाइन रस्त्यावर असलेल्या माय सिनेमा मल्टिप्लेक्सला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात सर्वाधिक 21 लाखांचे उत्पन्न ‘दुनियादारी’ने मिळवले. मराठी चित्रपट सातपेक्षा जास्त आठवडे गर्दी खेचू शकतो, हे ‘दुनियादारी’ने दाखवून दिले.

‘माय सिनेमा’चे रमेश वाबळे म्हणाले, ‘दुनियादारी’ला पहिल्या आठवड्यात थोडा कमी प्रतिसाद होता. मात्र, दुसर्‍या आठवड्यापासून तो वाढत गेला. तरुणांपासून साठीपर्यंतचे रसिक हा चित्रपट आवर्जून पहायला येतात. सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ ही कादंबरी 1982 मध्ये प्रकाशित झाली. ती प्रचंड गाजली. तेव्हा तरुण असलेल्या मंडळींना, तर या पुस्तकातील ‘कट्टा गँग’ने भुरळ घातली होती. तेव्हाची पिढी आता पन्नाशीच्या पुढे असली, तरी जुन्या सोनेरी आठवणींना उजाळा देत नॉस्टेलिजीयात रमण्यासाठी ते ‘दुनियादारी’ला येतात.

मागील वर्षभरात प्रदर्शित झालेल्या कोणत्याच मराठी किंवा अन्य भाषेतील चित्रपटाला, अगदी ‘चेन्नई एक्स्प्रेस’लाही नगरमध्ये इतके यश मिळाले नव्हते. ‘बालक-पालक’ला 4 लाख 41 हजार, तर ‘झपाटलेला’ या चित्रपटाला 3 लाख 86 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत ‘दुनियादारी’ची झेप मोठी ठरली, असे वाबळे म्हणाले.