आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी 18 शिक्षक बनावट अपंग !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बनावट अपंगत्व प्रमाणपत्र प्रकरणी पुणे येथील ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 18 शिक्षक दोषी आढळले आहेत. त्यामुळे बनावट अपंग शिक्षकांची संख्या 51 वरून 69 वर पोहोचली आहे. 89 कर्मचार्‍यांची प्रमाणपत्राची मुदत संपली आहे. अशा कर्मचार्‍यांनी एका महिन्यात ही प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
पाच वर्षांत अशी प्रमाणपत्रे देऊन किती जणांनी सवलती लाटल्या याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे त्यावेळी असलेल्या शिक्षणाधिकार्‍यांवरही चौकशीची कुर्‍हाड कोसळणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वतरुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत बदल्यांतून सूट मिळवण्यासाठी सुमारे 280 अपंग असल्याची प्रमाणपत्रे सादर करण्यात आली होती. त्यातील काही महाभागांनी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने 270 प्रमाणपत्रे जिल्हा रुग्णालय व पुणे येथील ससून रुग्णालयाकडे पडताळणीसाठी पाठवली होती. जिल्हा रुग्णालयाने 51 प्रमाणपत्रे बोगस असल्याचे स्पष्ट केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या शिक्षकांना अग्रवाल यांनी यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. मंगळवारी या सर्व शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार आणखी 18 प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही संख्या आता 69वर पोहोचली आहे.
बनावट प्रमाणपत्रांमुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या शिक्षकांवर कारवाई होऊ नये यासाठी मंत्रालय स्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव आणला जात होता. मात्र, अग्रवाल यांनी ही धाडसी कारवाई केली.याबाबत अग्रवाल म्हणाल्या, ‘‘बनावट अपंगाची प्रमाणपत्रे सादर करणार्‍या शिक्षकांनी दिलेला खुलासा असमाधानकारक होता. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पाच वर्षांत ज्यांनी या सवलतीचा फायदा घेतला त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षक व वकिलांच्या संपर्कात आहोत. ससून रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार 18 प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे सांगितले.
इतर सवलतीही लाटल्या - ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभे करायचे तेच खोटी प्रमाणपत्रे सादर करून सवलती लाटत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. बदली रोखण्याबरोबरच अपंगांना व्यवसाय करात सवलत, प्राप्तिकरात सवलत, एसटीच्या भाड्यात 75 टक्के सवलत, रेल्वेभाड्यात 75 सवलत अशा सवलती मिळतात. यापैकी त्यांनी प्राप्तिकरात किती सवलत मिळवली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस अधीक्षकांचे पत्र मिळाले नाही - कारवाईबाबत पोलिस अधीक्षकांनी पत्र पाठवले हे केवळ वृत्तपत्रांमधून वाचले. प्रत्यक्ष तसे पत्र मिळालेले नाही. मात्र, पोलिस अधीक्षकांशी या प्रकरणाबाबत चर्चा झाली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
प्रमाणपत्र एकाचे, लाभधारक दुसराच.. - काही प्रमाणपत्र एकाचे व लाभधारक दुसराच असाही प्रकार निदर्शनास आला आहे. पाच वर्षांत ज्या 89 जणांची मुदत संपली आहे, त्यांनाही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.’’ रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प.