आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duplicate Handicap Certificate Issue At Ahmednagar

आणखी 11 शिक्षकांची पोलिस कोठडीत रवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी 11 शिक्षकांची रवानगी पोलिस कोठडीत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी मंगळवारी दिले.

5 जानेवारीपासून संबंधित शिक्षक न्यायालय व पोलिसांसमोर हजर होण्याचे सत्र सुरू झाले. अटक केलेल्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमाणपत्रे देणार्‍या मध्यस्थांची नावे उघड होत आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या 88 वर गेली असून त्यातील 58 जणांना अटक करण्यात आली आहे. 14 जानेवारीला 34 शिक्षकांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली.

मंगळवारी या गुन्ह्यातील 11 शिक्षक कोतवाली पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून न्यायाधीश इंदलकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. अँड. संगीता ढगे व तपासी अधिकारी अभिमन पवार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. अपंगत्वाची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणार्‍या रॅकेटची पाळेमुळे शोधावयाची आहेत. प्रत्येक प्रमाणपत्रावर तीन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सह्या आहेत. या सह्या नेमक्या कुणाच्या आहेत, प्रमाणपत्रांवर शिक्के कुणी मारले याचा शोध घ्यायचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाने केली. न्यायाधीश इंदलकर यांनी या 11 शिक्षकांना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. दरम्यान, सोमवारी अटक केलेल्या एका शिक्षकाचे नाव ज्ञानेश्वर बाळूजी मावळे (बाबुरावनगर, शिरूर, जि. पुणे) असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करून देणार्‍या पाचजणांची नावे निष्पन्न झाली आहेत. बन्सी जगताप (अळकुटी), भीमाबाई विठ्ठल शिर्के (कर्जुले हर्या), शिवाजी हुलवाळे (खडकवाडी), दिगंबर आबासाहेब फराटे (ढोकराई) व नितीन आंधळे (पत्ता माहीत नाही) अशी त्यांची नावे आहेत.