आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस हात हलवत परतले माघारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातील अडीच कोटींच्या बोगस कर्जवाटप प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळले. हे अर्ज फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम राबवली. दोन आरोपींना पकडण्यासाठी पथक बीडमध्ये गेले खरे, पण आरोपींनी आधीच धूम ठोकल्यामुळे पोलिसांना हात हलवत परत यावे लागले.
आर्थिक गैरव्यवहार सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान झाला आहे. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा अपहार उजेडात आला. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक बी. एल. नाईक यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. एप्रिल महिन्यात सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये नाशिक येथील एका निलंबित महाव्यवस्थापकाचाही समावेश आहे.

तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक अशोक वि. नागरे (पंचरत्न ग्रीन व्हिलेज, प्लॉट नं. ४०२, बिल्डिंग नं. २०, मशाचा पाडा रस्ता, काशिगाव, मीरा रोड, जि. ठाणे), बीड जिल्हा बँकेचा माजी व्यवस्थापक योगेश बाबासाहेब सानप (बीड), गणेश बाबासाहेब सानप (बीड), रवींद्र शंकर कांबळे (के १०२, विजया पार्क, पहिला मजला, सुप्रीम पार्कसमोर, मीरा रोड, जि. ठाणे), निलंबित महाव्यवस्थापक प्रमोद नीळकंठ चव्हाण (ज्योतिष गुरुच्या घरासमोर, समर्थनगर, वडाळा, पाथर्डी रोड, जिल्हा नाशिक) प्रल्हाद कचरू गजभिये अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी संगनमत करुन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून एनबीसीएफडीसी, नवी दिल्ली योजनेंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातीमधील ५० लाभार्थी अर्जदारांना त्यांच्या नावे प्रत्येकी लाखांप्रमाणे पन्नास धनादेश दिले. त्यासाठी लाभार्थींची बनावट कागदपत्रे, जातींचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे लाख रुपयांचे पन्नास धनादेश अलाहाबाद बँकेच्या नगर शाखेत महामंडळाच्या खात्याच्या नावे दिले. नंतर हे धनादेश बीड मध्यवर्ती सहकारी बँकेत वटवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली.

कोतवालीते गुन्हे शाखा
सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे कोतवालीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील करत होते. दरम्यान, या अपहाराची रक्कम मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होऊनही त्यांना अद्याप आरोपींना अटक करता आलेली नाही.

अटकपूर्व जामीन फेटाळले
गुन्हादाखल झाल्यानंतर सहाही आरोपी फरार झाले. आरोपींच्या वतीने सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गणेश सानपवगळता इतर आरोपींनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. तेथे सादर केलेले अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळले.
बातम्या आणखी आहेत...