आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्हा रुग्णालयात आर्थिक पिळवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- खासगी रुग्णालयाचा खर्च न पेलवणारे रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. या रुग्णांवर उपचारासह औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे. तथापि, अनेकदा रुग्णांना स्वखर्चाने महागडी औषधे बाहेरून आणावी लागतात. हाडाच्या शस्त्रक्रियेसाठी स्टील रॉड खासगी मेडिकलमधून न्यावे लागतात.

जिल्हाभरातून गरजू व गरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. या आधीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटुरकर यांनी रुग्णालयाला ‘कॉर्पाेरेट लूक’ दिला. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली. मात्र, रुग्णांच्या हेळसांडीचा प्रश्न कायम आहे. अपघात, तसेच इतर कारणांनी इजा झालेले रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. बर्‍याचदा शस्रक्रिया करून ‘रॉड’ टाकावा लागतो. संबंधित डॉक्टर स्वत:ची स्वाक्षरी न करता रॉड व औषधांसाठी रूग्णाच्या नातेवाईकांना एका औषधविक्रेत्याकडे पाठवतात. तेथे पैसे जमा केल्यानंतर हा विक्रेता रॉड रुग्णालयात पोहोच करतो. सरकारच्या विविध योजनांतून उपचाराची आवश्यक औषधे खरेदी करता येतात. पण रुग्णांनाच खासगी मेडिकलमधून औषधे आणावी लागत असल्याने सरकारच्या योजना कागदावरच आहेत. या विरोधात आवाज उठवल्यास चांगले उपचार मिळणार नाहीत या भीतीपोटी रुग्ण तक्रार करत नाही. काही रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा प्रकार ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितला.

रंगनाथ देवीकर यांची कैफियत

देविकर रंगनाथ रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या पायाच्या हाडाला इजा झाली आहे. साखर नियंत्रणात येत नसल्यामुळे शस्त्रक्रिया झाली नाही. त्यामुळे त्यांना घरी जायला सांगून इन्शुलिन घेण्याचा सल्ला देण्यात आला. ही लूट थांबवावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

कारवाई करू..

रुग्णालयात उपचारांसाठी खासगी मेडिकलमधून औषधे आणण्याचा सल्ला रुग्णांना दिला जात असेल, तर आमच्याशी संपर्क साधावा. त्याची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाईल. पण अद्यापी तशी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल.’’ यू. बी. तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी.

पैसे भरल्याचे बिल मिळत नाही
शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर डॉ. प्रभास पाटील आणि डॉ. सुराणा हे चेतना मेडिकलच्या नावाने चिठ्ठी लिहून देतात. तेथे गेल्यानंतर साडेसहा हजार रुपये भरण्यास सांगितले जाते. शासकीय रूग्णालय गरिबांसाठी मोफत असेल, तर पैसे कशासाठी भरावे लागतात? पैसे भरल्याचे कोणतेही बिल दुकानदार देत नाहीत. चार तासांनंतर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ‘रॉड’ रूग्णालयात पोहोच केले जातात. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार करणार आहोत, असे हिरकणी महिला बचत गटाने तक्रारीत म्हटले आहे.

मेडिकलमार्फत होते वसुली
माझे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात तीन आठवड्यांपासून अँडमिट आहेत. त्यांच्या हाडाला इजा झाली आहे. मात्र, त्यांना जाणीवपूर्वक डिस्चार्ज दिला जात आहे. साखर कमी होत नसल्याचे कारण सांगितले जाते. रुग्णालयातच साखर नियंत्रणात येत नसेल, तर घरी जाऊन कशी कमी होईल? अशा इतर रुग्णांकडूनही साडेसात हजार रुपये तारकपूर येथील एका मेडिकलमार्फत घेतले जातात. त्यानंतर रॉड रुग्णालयात पोहोच केला जातो.’’ आशा साठे, सामाजिक कार्यकर्त्या.

रुग्णांकडून विचारणा
औषधे उपलब्ध नसल्यास बीपीएल व इतर रुग्णांना स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करून दिली जातात. या प्रक्रियेस वेळ लागतो. लवकर पाहिजे असतील, तर रुग्ण विचारतात बाहेरून औषधे आणता येतील का? रुग्णाच्या परवानगीनेच त्यांना सल्ला दिला जातो.’’ एस. पी. पोखरणा, वैद्यकीय अधिकारी

आरोप खोटे
आरोप खोटे आहेत. आम्ही कोणालाही बाहेरून औषधे किंवा साहित्य खरेदी करण्याबाबत दबाव आणत नाही. साहित्य उपलब्ध नसते तेव्हा तशी कल्पना देऊन बाहेरून आणण्यास सांगितले जाते. एका रुग्णाची साखर नियंत्रणात नसल्याने त्यास घरी जाण्याचा सल्ला दिला होता. ’’ डॉ. प्रभास पाटील, जिल्हा रुग्णालय.