आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Committee Issue At Nagar, Divya Marathi

शिक्षण समितीच्या सभेवर सदस्यांचे बहिष्कार अस्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सभेत चर्चा होते. मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. निधी असूनही तो खर्च केला जात नाही, असा आरोप करून जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शिक्षण समितीच्या सभेवर सोमवारी बहिष्कार घातला.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेच्या सुरुवातीला मागील इतिवृत्ताचे वाचन सुरू असतानाच सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून मागील सभांमध्ये झालेल्या चर्चेवर काय कार्यवाही याची विचारणा केली. प्रश्न मांडून सभेत सकारात्मक चर्चा केली जाते, पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत सदस्यांनी सभेवर बहिष्कार घातला.

नंतर सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. सदस्य संभाजी दहातोंडे, अ‍ॅड. आझाद ठुबे, परबत नाईकवाडी, प्रवीण घुले आदी या वेळी उपस्थित होते. ठुबे म्हणाले, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाखोल्या बांधण्यात आल्या आहेत. खोल्यांचे काम पूर्ण करून संबंधित शाळांमधील शिक्षकांनी स्वत:च्या जोखमीवर बांधकाम साहित्य खरेदी केले. मात्र, पाच टक्के बिले अदा न झाल्याने शिक्षकांची अडचण झाली आहे. यासंदर्भात शिक्षण समितीच्या सभेत तीन-चारवेळा चर्चा झाली. परंतु अद्यापि बिले अदा करण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे आम्ही सभेवर बहिष्कार घातला.
घुले म्हणाले, शिक्षण विभागातील बदल्या करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करून बदल्या करण्यात आल्या. सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याची आमची मागणी आहे. मात्र, पटसंख्येकडे दुर्लक्ष करून संबंधित गटशिक्षणाधिकारी शिक्षकांची पिळवणूक करत आहेत. चुकीच्या कामांसंदर्भात शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांना विचारले असता ते मुख्य कार्यकारी अधिका-यांचे नाव पुढे करतात.
प्रशासनाच्या चुकीमुळे निधी अखर्चित
जिल्ह्यातील शाळाखोल्यांच्या दुरुस्तीसाठी, तसेच संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध होता. हा निधी फेब्रुवारी 2013 अखेर खर्च न झाल्यास त्याचे फेरनियोजन करण्याच्या सूचना सदस्यांनी प्रशासनाला या वेळी दिल्या होत्या. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी खर्च झाला नाही. त्यामुळे हा निधी शासनाला परत पाठवण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढावली, असा आरोप सदस्य प्रवीण घुले व अ‍ॅड. आझाद ठुबे यांनी केला.
संयुक्त बैठक हाच पर्याय
शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत आमची नाराजी आहे. शिक्षण समितीचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक बोलावून याविषयी चर्चा व्हायला हवी. जोपर्यंत अशी बैठक घेतली जात नाही, तोपर्यंत आमचा शिक्षण समितीच्या सभांवर बहिष्कार राहील, असेही समितीच्या सदस्यांनी सांगितले.