आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभाग मागणार दराडेंकडे पुरावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सीईटीधारक शिक्षकांना नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केला असून त्याचे पुरावे असल्याचेही जाहीर केले आहे. याप्रकरणात शशिकांत रासकर यांचे नावही त्यांनी घेतले होते. याप्रकरणी दराडे यांच्याकडून गैरव्यवहाराचे पुरावे मागण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सीईटीधारक पात्र शिक्षकांना नियुक्ती दिली. ही नियुक्ती देत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. त्याबाबत दिव्य मराठीने सविस्तर वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानंतर गुरुवारी (१८ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य दराडे यांनी हा विषय उपस्थित केला. या नियुक्ती प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला अाहे. त्याचे धागेदोरे वरपर्यंत पोहोचले आहेत. त्यात शिक्षण विभागातील रासकर यांचा समावेश असून त्यांनी पैसे मागितले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. पैसे मागितल्याच्या क्लिप असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दराडेंकडे पुरावे सादर करण्याची मागणी करणार आहे. ज्या शिक्षकांकडे पैशाची मागणी केली त्यांनाही बोलावून चौकशीत जबाब घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियाच पारदर्शीपणे पार पडली असताना केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीची दराडे यांनी रासकर यांच्यावर आरोप केले असल्याचे काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. तर रासकर यांनी आपण चूक केली नसल्याचे स्पष्ट करून चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दराडे यांनी संबंधित शिक्षकांचे नाव गोपनीय ठेवावे लागेल.

नियुक्त्या पारदर्शी केल्याचा दावा
शिक्षणविभागाने सीईटीधारकांना नियुक्ती देताना त्यांच्या सोयीनुसार जागा दिल्या. या जागा देत असताना इतर जिल्ह्यातील उमेदवारांना सोयीची जागा कोणती हे सांगता येत नव्हते. पण जेथे शिक्षकांची गरज अधिक निकडीची आहे, तेथे सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...