आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शिक्षणाधिकार्‍यांसह उपशिक्षणाधिकार्‍यास नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शासनाने जाहीर केलेल्या नवीन कर्मचारी प्रशिक्षण धोरणासाठी माहिती पाठवण्यास विलंब केल्याप्रकरणी लिपिक एस. टी. माने यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकार्‍यांनाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

मागील वर्षी राज्य सरकारने कर्मचार्‍यांसाठी नवीन प्रशिक्षण धोरण जाहीर केले होते. प्रशासकीय सेवेत नव्याने भरती होणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. सरकारने जिल्हा परिषदेकडे सर्व विभागांतील कर्मचार्‍यांची माहिती मागवली होती. ही माहिती फेब्रुवारी 2013 पर्यंत सरकारला सादर करायची होती. पण शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांची माहिती अद्यापि पाठवली गेली नाही. अग्रवाल यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाला माहिती पाठवण्याबाबत पत्र दिले, मात्र शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. यापार्श्वभूमीवर अग्रवाल यांनी संबंधित टेबलचे काम पाहणारे लिपीक माने यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित केले. तसेच शिक्षणाधिकारी गोविंद, उपशिक्षणाधिकारी काळे, निरंतरचे शिक्षणाधिकरी नरेंद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी निरंतर पी. एस. काळे यांना नोटिसा बजावल्या आहेत. कर्मचार्‍यांची माहिती तातडीने सादर न केल्यास या सर्वांवरील कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांना बजावल्या नोटिसा
शासनाने मागितलेली माहिती पाठवण्यासाठी एस. टी. माने यांनी पाठपुरावा केला. पण पारनेर, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, नगर व अकोले तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांनी माहिती पाठवलीच नाही. त्यामुळे संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांना शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.