आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational Quality,Latest News In Divya Marathi

मुलांचे दुर्लक्षित भावविश्व उलगडणारा ‘दोस्त माझा मस्त’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मुलांचे दुर्लक्षित भावविश्व, पाल्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा विचार न करता पालक जोपासत असलेला ‘मार्क्स’वाद, शिक्षकांचा फक्त शैक्षणिक गुणवत्तेचा आग्रह आणि घरात व बाहेर सतत होणा-या तुलनेने बळावलेला न्यूनगंड हा विषय परिसंवाद, चर्चासत्रे, बालनाट्य व समुपदेशकांच्या व्याख्यानात अनेकदा मांडला गेला. पण हाच विषय केंद्रस्थानी ठेवून शेवगावच्या प्रा. मफिज इनामदार, दादा नवघरे व उमेश घेवरीकर या हौशी रंगकर्मींनी ‘दोस्त माझा मस्त’ हा एक तासाचा सीडी चित्रपट तयार केला आहे.
राजू (यश फलके) हा भोळा भाबडा मुलगा वेंधळ्या स्वभावामुळे अभ्यासात मिनी (मुग्धा तडवळकर) या बहिणीच्या व वर्गातील इतर मुलांच्या तुलनेत मागे असतो. त्याचे दु:ख त्याच्या आई-वडिलांना आहे. त्याचे शिक्षक व इतर मित्र त्याची सतत टवाळी करत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला समजावून घेणारे कुणीतरी असावे, या सततच्या विचारांतून राजूला भास होऊ लागतात. त्याला त्याच्या स्वप्नातील उस्मान (अमन इनामदार) हा मित्र मदत करू लागतो, त्याला आत्मविश्वास देतो आणि भोळ्या भाबड्या राजूचे स्मार्ट राजूमध्ये परिवर्तन घडते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दादा नवघरे यांचे असून यात बालकलाकार समीर काझी, अश्रफ शेख, वीरेंद्र बैरागी, सुहास लहासे, मनीषा गायके यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचा पहिला खेळ स्नेहालयातील उपेक्षित व अभावग्रस्त मुलांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, हा बालचित्रपट नसून पालक व शिक्षकांचे समुपदेशन करणारा वस्तुपाठ आहे. मुलांच्या समस्या मुलांच्याच माध्यमातून मांडल्या गेल्या, तर त्या हृदयाला भिडतात, असे चित्रपट पाहताना जाणवते. हा चित्रपट सर्व शाळांमध्ये दाखवायला हवा.