आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषदेच्या सभांना महसूल अधिकार्‍यांनी जावे; विभागीय आयुक्त सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अधिकारी व पदाधिकारी हे एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सभेसाठी बोलावल्यास महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी जायला हवे. विकासकामांत कोणीही ‘इगो प्रॉब्लेम’ करू नये, अशा स्पष्ट सूचना नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत सोमवारी आढावा बैठक झाली. यापूर्वी दुष्काळी प्रश्नांवर बोलावलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभांना महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दांडी मारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी महसूलच्या सभांना जि. प. अधिकार्‍यांनी जाऊ नये, असा ठराव मांडला होता. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जिल्हा परिषद सदस्यांनी या कळीच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. सदस्य फाळके म्हणाले, दुष्काळाबाबतच्या सभांना महसूलचे अधिकारी उपस्थित रहात नाहीत. टँकर बंद करताना ग्रामपंचायतीला विचारले जात नाही. तहसीलदार परस्पर टँकर बंद करण्याचा निर्णय घेतात. गटविकास अधिकारी हा तहसीलदार दर्जाचा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकार्‍यांच्या दर्जाचे, तर आयएएस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या दर्जाचे अधिकारी आहेत. असे असतानाही महसूलच्या अधिकार्‍यांकडून जिल्हा परिषदेच्या सभांना टाळाटाळ केली जाते.

मंत्री पिचड यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय घडवून आणला. महसूल अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकांना उपस्थित रहावे, अशा सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. ते म्हणाले, अधिकारी व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय ठेवण्याचे मला नगर जिल्ह्याने शिकवले. अधिकारी व पदाधिकारी ही रथाची दोन चाके आहेत. एक चाक लहान-मोठे असून चालत नाही. दोघांमध्येही समन्वय असायला हवा. या समन्वयासाठी मी विभागीय पातळीवरील बैठकांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी दोघांनाही एकाचवेळी बोलावतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सभेला बोलावल्यास महसूलच्या अधिकार्‍यांनी जायला हवे. कोणीही इगो प्रॉब्लेम करू नयेत. आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत. आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, शाहूराव घुटे, हर्षदा काकडे, कैलास वाकचौरे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यावेळी उपस्थित होते.