आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदमुळे बाजारपेठेत उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुस्लिमसमाजाचा महत्त्वाचा सण असलेल्या रमजान ईदची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानात शनिवारी सामूहिक नमाज अदा केली जाणार आहे.

ईदनिमित्त चितळे रस्ता, कापडबाजार घासगल्ली परिसरात कपडे, सौंदर्य प्रसाधने शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कोठला स्थानक परिसरातील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा केला जाणार आहे. त्यासाठी या मैदानाची साफसफाई करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक जमत असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील सर्वच मशिदींमध्ये सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत नमाज अदा केली जाणार आहे.
ईदच्या दिवशी शिरखुर्मा हा विशेष पदार्थ करण्यात येतो. आप्तस्वकियांना गोड मधुर असलेल्या शिरखुर्म्याचे निमंत्रण दिले जाते. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांच्याच घरात ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो. त्यासाठी लागणारे काजू, बदाम, किसमीस, चारोळी, टरबूज बी, खरबूज बी, आक्रोड, पिस्ता, खोबरे, विलायची, बडीशेप, तूप, शेवई आदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

वाहतुकीत बदल
नमाजपठण होणारी मैदाने, मैदानांच्या परिसरात होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी शहर आणि जिल्हा वाहतूक शाखेची खास पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत ही पथके कार्यरत असतील. ईदगाह मैदानावर होणारी गर्दी लक्षात घेता कोठला भागातील नगर-औरंगाबाद महामार्ग काहीवेळ एकेरी सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांनी दिली.

कडेकोट बंदोबस्त
रमजानईदचा सण शांततेत पार पडावा, यासाठी जिल्ह्यात बाराशे पोलिस तैनात केले आहेत. प्रत्येक हालचालींवर पोलिसांची नजर आहे. नमाज पठणाच्या वेळी मैदानांच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेची स्वतंत्र पथके तैनात असतील. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी जिल्ह्यातील पोलिस बळाचा आढावा घेत मुस्लिमबहुल भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांचेही फिक्स पॉइंट राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...