आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गंभीर दखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचा भंग करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करणा-याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शनिवारी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, कोणकोणत्या पक्षात प्रवेश करणार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार काय? सेना, भाजप, आरपीआय कडवी झुंंज देईल काय, अशा चर्चांना जिल्ह्यात उधाण आले आहे. पारावर रंगलेल्या गप्पा व पक्षाचे श्रेष्ठत्व सांगण्यात पदाधिकारीही दंग झाले आहेत. या कालावधीत त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास त्यांना निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जी. आर. दळवी, अरुण पवार व इतर सहा सदस्यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आचारसंहितेच्या भंगाबाबत येणा-या तक्रारींबाबत संबंधित तालुका निवडणूक अधिका-यांकडून चौकशी अहवाल मागवून निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. आचारसंहितेचे निकष लक्षात घेऊन होणार आहे.
आचार संहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना केवळ स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्मे व देशाचा गौरव याबाबतच भाषणे करता येतील. या समारंभात प्रचाराची भाषणे करता येणार नाहीत. कोणताही राजकीय पक्ष वा उमेदवार ध्वजदंड उभारण्यासाठी संबंधित जागा मालकाची परवानगी आवश्यक आहे. अचार संहितेबाबत काही शंका असल्यास संपर्क साधावा असे आवाहन जगताप यांनी केले.
कारभा-यांनो खर्चाचा हिशेब द्या, अन्यथा 5 वर्षांसाठी अपात्र
नामनिर्देशनपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून उमेदवारांना आपल्या दैनंदिन खर्चाची माहिती दुस-या दिवशी दोन वाजेपर्यंत निवडणूक अधिका-याला द्यावी लागणार आहे. अन्यथा, संबंधित उमेदवाराला अनर्ह ठरवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक अधिकारी नितीन गावंडे यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत खर्चाचा हिशेब विहित मुदतीत न दिल्यामुळे लोणार नगर परिषदेतील सुमारे 63 उमेदवारांना अनर्हतेच्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच, अमरावती, बीड जिल्हा परिषदांतील प्रत्येकी एक व जालना पंचायत समितीमधील दोन उमेदवारांना हिशेब न दिल्याच्या कारणावरून सहा महिन्यांपूर्वी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या नियमानुसार दैनंदिन कामाच्या हिशेब दुस-या दिवशी दोन वाजेपर्यंत देणे अनिवार्य आहे. हा हिशेब नामनिर्देशन पत्र भरल्यापासून (18 जानेवारी) मतमोजणीपर्यंतचा हिशेब द्यायचा आहे, असे गावंडे यांनी सांगितले.
आचार संहितेचा भंग केव्हा ?
शासकीय खर्चातून केलेल्या कामांचे उद््घाटन, समारंभ करणे
उमेदवारांनी निवडणुकीच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर न केल्यास
शासकीय दौ-यात खासगी प्रचार करणे
निवडणूक प्रचारासाठी प्रार्थना स्थळाचा वापर करणे
वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशीला बसवणे यासह इतर बाबी
शौचालय नसल्यास उमेदवार अपात्र
नामनिर्देशन अर्ज सादर करताना उमेदवाराकडे सौचालय असल्याबाबतचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. असे, न करणा-या उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.