आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Of India,latest News In Divya Marathi

पथनाट्यांद्वारे जिल्ह्यात होतेय मतदार जागृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "वोट इंडिया वोट', "मतदानाचा अधिकार देई लोकशाहीला आधार', "मत द्यायला जायचे आहे आपले कर्तव्य बजावायचे आहे', "देशाचा मतदार युवा घडवी विकास नवा' अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर, पथनाट्यातून साद घालणारे 7-8 तरुण पथनाट्य संपल्यावर कोण-कोण करणार मतदान या प्रश्नाला हात उंचावून उत्तर देणारे हात, असे चित्र जिल्हाभर दिसले.
भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा यांच्या वतीने आयोजित मतदान जनजागृतीसाठी सुमारे 50 पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. हे पथनाट्य सुमारे पाऊण लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. वोट इंडिया वोट व युवा भारत ग्रूपच्या वतीने कलाकार अमोल बागूल, किरण घालमे, शैलेश थोरात, चाणक्य नेहूल, महेश जाधव, गणेश ढोले, यशवंत तोडमल, अरमान शेख यांनी जिल्हाभर पथनाट्य सादर केली. या पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शन, संगीत व वेशभूषा अमोल बागूल यांनी केले. भारत निवडणूक आयोगाचे केंद्र निरीक्षक धर्मेश तिवारी, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पथनाट्याचे कौतुक केले. उपजिल्हाधिकारी डी. एम. बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. या पथनाट्यामध्ये मतदानाचे महत्त्व, निवडणूक ओळखपत्राची प्रक्रिया, मतदान जागृतीची गाणी, कविता, घोषवाक्य, मतदानाची प्रतिज्ञा व संविधानाचे वाचन या व इतर घटकांचा समावेश होता. ही पथनाट्ये पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पथनाट्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: आठवडे बाजाराच्या दिवशी होणारी पथनाट्ये पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत.
लघुपटाचे प्रदर्शन
शेवगाव येथील हौशी रंगकर्मी व उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी तयार केलेला "व्होट फॉर बेटर इंडिया' हा लघुपट रविवारी (12 ऑक्टोबर) साम वाहिनीवरून सकाळी 11 व रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे.
अवघ्या दीड मिनिटाच्या या लघुपटातून मतदानाची काळी शाई ही मध्यवर्ती कल्पना घेऊन मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश समर्पक पद्धतीने देण्यात आला आहे. आई बाळाला तीट लावते तितक्याच मायेने युवती कपाळी गंध लावते, तितक्याच प्रेमाने व भक्तीने देवाला टिळा लागतो, तितक्याच भक्तिभावाने मतदान करावे हा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.
या लघुपटात शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थिनी भक्ती शिंदे, रोहिणी डहाळे व अभिषेक गालफाडे यांनी भूमिका केल्या आहेत.

शेवगावच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार हरिश सोनार यांनी ही या लघुपटाचा मतदान जागृतीसाठी उपयोग केला. त्यांच्याच प्रेरणेतून घेवरीकर यांनी त्यांच्या शाळेतील आरती अकोलकर, मुग्धा तडवळकर, साक्षी झोटिंग, रिषभ जिरेसाळ, रितेश ठुबे या विद्यार्थ्यांसह पथनाट्याद्वारे पाथर्डी व शेवगाव येथील मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या २० गावांतून मतदार जागृती अभियान राबवले आहे.