आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Take Action On Social Sites, Divya Marathi

सोशल साईटस्वरही आयोगाची करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- व्हॉट्स अप, तसेच फेसबुकसारख्या सोशल साईटस्वर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, अशा प्रचारावरही निवडणूक आयोग नजर ठेवून आहे. हायटेक पद्धतीने प्रचार झाल्यास त्याचाही खर्च संबंधित उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे.

स्मार्टफोनकडे तरुणाईचा कल वाढल्याने माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी व्हॉटस् अप, फेसबुकसारख्या सोशल साईटस्चा मोठय़ा प्रमाणात वापर सध्या होत आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षाची नजर चुकवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे ग्रूप स्थापन करून प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. अमुक एका उमेदवाराला विजयी करा, असे सांगणारे चिन्ह असलेले पोस्टर एकमेकांना शेअर केले जात आहेत. कोणत्याही व्यक्तीला विचार मांडता येतात. मात्र, आचारसंहिता कालावधीत असा विनापरवाना प्रचार करता येणार नाही. तसे होत असेल, तर प्रशासनाची यंत्रणा संबंधितांवर नजर ठेवणार आहे.

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, झेंडे लावणे यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारनिहाय खर्चर्मयादा 70 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. खर्चाच्या सर्वसाधारण बाबी व त्यासाठीची दरसूची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये मंडप व बैठक व्यवस्था, वाहतूक, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जेवण, छपाई, इलेक्ट्रॉनिक व इंटरनेट माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधणे या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावर खर्च देखरेख कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाची जबाबदारी जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सोशल साईटस्वर पक्षाचा प्रचार होत असेल, तर तो खर्च पक्षाच्या नावे धरला जाणार आहे.

सोशल मीडियाचा खर्च गृहित धरू
प्रसारमाध्यमे, तसेच सोशल साईटस्वर प्रचार केल्यास संबंधित उमेदवाराच्या, पक्षाच्या नावावर खर्च गृहित धरला जाईल. व्हॉटस् अपवर होणार्‍या प्रचारावर कारवाई करण्यात अडचणी आहेत. पण जिल्हा, राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. यातून कोणीही सुटू शकणार नाही.’’ विजय कोते, खर्च नियंत्रण कक्षाधिकारी.

तक्रार आल्यास कारवाई
व्हॉटस् अप व फेसबुकवर विनापरवाना प्रचार केला जात असेल, तर तक्रार करावी. तक्रार आल्यानंतर तातडीने संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबंधित यंत्रणेलाही तसे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्यावर कुणाचीही नजर नाही, या अविर्भावात आचारसंहितेचा भंग करू नये.’’ डॉ. सदानंद जाधव, आचारसंहिता कक्ष.