संगमनेर- विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शपथपत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तातडीने टाकण्यात आली. 'दिव्य मराठी'ने गुरुवारी (२ ऑक्टोबर) आयोगाला संगमनेरच्या उमेदवारांच्या विसर पडल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे हे संकेतस्थळ अपडेट झाले.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्वच उमेदवारांची शपथपत्रे टाकण्यात आली होती. मात्र संगमनेरमधून निवडणूक लढवत असलेल्या दहापैकी केवळ एकाच उमेदवाराचे शपथपत्र या संकेतस्थळावर होते. तर तीन उमेदवारांची नुसतीच नावे टाकण्यात आली होती. त्यापैकी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही त्याचे नाव या संकेतस्थळावर कायम होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अपवाद वगळता या संकेतस्थळावर अन्य कोणाचीही शपथपत्रे नसल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने शुक्रवारी प्रकाशित केले. त्यानंतर हे संकेतस्थळ अपडेट केले गेले. नव्याने अपडेट केलेल्या संकेतस्थळावर संगमनेरमधून निवडणूक लढवत असलेल्या सर्व दहा उमेदवारांची शपथपत्रे आहेत. यात भाजपचे राजेश चौधरी, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे बासाहेब थोरात, शिवसेनेचे जर्नादन आहेर, बसपाचे अॅड.प्रकाश आहेर, नवजवान सेना पक्षाचे कालीराम पोपळघट यांच्याह चार अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.