आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Contender Teacher On Zilha Parishad Radar

निवडणूक लढवणारे शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुजींनी मोर्चेबांधणी सुरू करून प्रचाराचेही नियोजन आखले आहे. तथापि, जे गुरुजी निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, अशांच्या शाळांची जिल्हा परिषद प्रशासन तपासणी करणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक नेत्यांसमोर गुणवत्तापूर्ण शाळांमधील शिक्षकांना उमेदवारी देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

बँकेच्या मतदारांची अंतिम यादी दोन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर शिक्षक नेत्यांनी प्रचाराला गती दिली. दहा दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक सुटीवर जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच शिक्षक संघटनांनी कंबर कसली असली, तरी सुट्या मिळवताना गुरुजींची दमछाक होणार आहे.

शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीला बोटावर मोजण्याएवढेच शिक्षक नेते उपस्थित होते. या बैठकीत ऐक्य मंडळाच्या नेत्यांनी बँकेच्या निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करून निवडणूक मे महिन्यात घेण्याची मागणी केली. परंतु नवाल यांनी हा आपला अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्यास तारीख बदलू शकते, असे या नेत्यांचे म्हणणे होते.
निवडणूक कालावधीत प्रचार करण्यासाठी शिक्षक मोठ्या प्रमाणात रजेवर जातात. त्यामुळे शाळा ओस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नवाल म्हणाले, ही निवडणूक बँकेची आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणुकीत जे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, अशांच्या शाळांची गुणवत्ता जिल्हा परिषद तपासणार आहे.
तपासणीनंतर शाळांची श्रेणीही जाहीर केली जाईल. रजा देण्याबद्दल दुमत नाही, पण एकाचवेळी मोठ्या संख्येने शिक्षक रजेवर गेले, तर विद्यार्थ्यांना कोण शिकवणार मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी एक दिवसाचा पगार देण्याचेही आवाहन नवाल यांनी केले. शिक्षकांचे संमतीपत्र घेतल्यानंतरच पगार कपात करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुरुजींच्या मागे निवडणुकीची लगीनघाई सुरू असतानाच प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे गुरुजींची धावपळ उडणार आहे, जर एखाद्या उमेदवाराची शाळा गुणवत्तापूर्ण नसेल, तर त्याचीही प्रसिद्धी होणार आहे. त्यामुळे बँकेचा गाडा हाकण्याचा दावा करणारा उमेदवार स्वत:च्या शाळेचा गाडा कसा हाकू शकतो, असा प्रश्नच सामान्य सभासदासमोर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांना पंचनाम्याच्या फॉर्म्युलाचा फटकाही बसण्याची शक्यता आहे. काही शिक्षक मंडळांमध्ये फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानुसार नेते सारवासारव करण्यात व्यग्र आहेत.
२० पटाच्या आतील शाळांवर टांगती तलवार
जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळा जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत. या शाळा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे. याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता केंद्रस्थानी मानून काम करण्याचेही निर्देश जिल्हा परिषदेने दिले आहेत.
निवेदने नकोत, ऑनलाइन तक्रार
शिक्षकांकडून येणाऱ्या लेखी निवेदनांवर कार्यवाही होत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असते. त्यामुळे शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षकांनी निवेदन देता ऑनलाइन तक्रार करावी. तक्रारप्रणाली ऑनलाइन उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवाल यांनी केले.