आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Expenditure News In Marathi, Election Commission, Divya Marathi

पहिल्याच टप्प्यात संपली उमेदवारांकडील रोकड,निवडणुकीसंबंधी स्वतंत्र बँक खाते नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या हाती असलेली रक्कम प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात संपली आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग द्यावा लागणार असून खर्चही वाढणार आहे. या खर्चाची तजवीज करताना, तसेच हा खर्च सादर करताना उमेदवारांची तारांबळ उडत आहे.


निवडणूक आयोगाने यावर्षी पहिल्यांदाच विविध पावले उचलत उमेदवारांच्या प्रचारखर्चावर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारासाठी खर्च करण्याकरिता उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते अनिवार्य करण्यात आले असून या खात्यातूनच प्रचार खर्च अदा करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. खर्चाचा तपशील सादर करताना आयोगाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दर्शवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कमी दराने खर्च दाखवल्याच्या कारणावरून बहुतांश उमेदवारांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. खर्चाची रक्कम रेखांकित धनादेशाद्वारे अदा करण्याचे बंधन न पाळल्यानेही अनेक उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.


पहिल्याच टप्प्यातील प्रचारात बहुतांश उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली रोकड संपली आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी त्यांच्या बँक, पतसंस्था आदी वित्तीय संस्थांतील बचत व ठेवींचा वापर करावा लागणार आहे. या पैशाचा स्त्रोतही स्पष्ट असावा लागणार आहे. खर्चाचे हिशोब व्यवस्थित न देणार्‍यांची निवड रद्द करण्याचे अधिकार आयोगाला आहेत.


आयोगाची भीतीच नाही
कडक कारवाईची तरतूद असतानाही बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीसंबंधी स्वतंत्र बँकखातेच अजून उघडलेले नाही. निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई होत नसल्याने उमेदवारांनीही निर्धास्तपणे मनमानी सुरू ठेवली आहे. आयोगाची भीतीच नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


70 लाख कोणाकडेही नाहीत
आयोगाने उमेदवारांच्या प्रचारखर्चासाठी 70 लाखांची र्मयादा निश्चित केली आहे. जिल्ह्यातील एकाही उमेदवाराकडे इतकी रोख रक्कम नाही. प्रमुख उमेदवारांकडे कोट्यवधींची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. मात्र, रोकड व बँक, पतसंस्था आदी वित्तीय संस्थांमध्ये बचत खात्यावरील शिल्लक रक्कम, ठेवी 70 लाखांपेक्षा कमी आहेत.


तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष
उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी व पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. खर्चाविषयी तक्रारी करण्यासाठी 18002333044 हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. नगर मतदारसंघात अनिलकुमार शर्मा, तर शिर्डी मतदारसंघासाठी के. ए. चंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.


अशी आहे खर्च व जमा रकमेची परिस्थिती
उमेदवार (नगर) खर्च (3 एप्रिलपर्यंत) शिल्लक रोकड (अर्ज भरताना) बचत, ठेवी
दिलीप गांधी 3,09,427 740400 1,28,070
राजीव राजळे 14,90,189 4,10000 4,81278
बी. जी. कोळसे 68,223 8,66250 14,45905
दीपाली सय्यद 106325 1,83000 1030711
उमेदवार (शिर्डी) खर्च (2 एप्रिलपर्यंत) शिल्लक रोकड (अर्ज भरताना) इतर ठेवी
भाऊसाहेब वाकचौरे 903429 4,71761 5330459
सदाशिव लोखंडे 4,32953 4,12750 147078
नितीन उदमले 66,879 35000 5,00000