आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव राजळेंविरोधात नेत्यांची मुंबईत फिल्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांना पक्षातर्फे उमेदवारी देऊ नये, असा आग्रह श्रीगोंदे, पारनेर, तसेच नगर तालुक्यातील काही नेत्यांनी गुरुवारी मुंबईत जाऊन श्रेष्‍ठीकडे धरला.

राष्ट्रवादी नगरची जागा लढवणार हे निश्चित झाल्याने पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी राजळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, पण त्यांना तिकीट मिळू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुंबई दरबारी फिल्डिंग लावली आहे. गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह श्रीगोंदे, पारनेर व नगर तालुक्यातील नेते प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटीत नेत्यांनी राजळेंच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना पारनेर, श्रीगोंदे तालुक्यांसह नगर शहरातील नेत्यांशी राजळेंनी कधीही जुळवून घेतले नाही. या नेत्यांना दुखावले तर त्यांना निवडणुकीत कोण मदत करणार, असा सवाल या शिष्टमंडळाने श्रेष्‍ठीं समोर उपस्थित केला.

यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचून राजळेंना समज देण्याची मागणीही प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पक्षातील मंडळींनीच तक्रारींचा पाढा वाचल्याने राजळेंची संभाव्य उमेदवारी धोक्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईत शुक्रवारी (31 जानेवारी) बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून दादा कळमकर, विक्रम पाचपुते, घनश्याम शेलार इच्छुक आहेत.