आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी यांच्या उमेदवारीस विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे लोकसभेची उमेदवारी संघटना मजबूत करणार्‍या व्यक्तीला मिळणार असेल, तर विद्यमान खासदार दिलीप गांधी या निकषांत कुठेच बसत नाहीत. त्यामुळे गांधी सोडून अन्य पर्यायांचा पक्षाने विचार करावा, असे मत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गांधी यांनी पक्ष संघटना मजबूत होण्यास कधीच प्राधान्य दिले नाही. उलट संघटनेमध्ये वेगवेगळे मतप्रवाह कसे राहतील, याची काळजी घेतली. कोणत्याच जिल्हाध्यक्षांशी त्यांचे कधीच सूत जुळले नाही. संघटन हा भारतीय जनता पक्षाचा मूळ आधार आहे. परंतु गांधी यांनी राजकीय स्वार्थापोटी त्याचा विचार केला नाही.

कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी स्वत:च्या मुलाला युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी बसवले. त्यांच्या वैयक्तिक आचरणामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. नगर अर्बन बँकेतील त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. सर्वच कार्यकर्ते पक्षासाठी झटत आहेत, गांधी मात्र स्वत:चे हित जोपासण्यात गुंतले आहेत. गांधी हे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना इतरांपेक्षा जबाबदारीचे जास्त असायला हवे, परंतु अजूनही ते भानावर आलेले नाहीत. एकेकाळी तत्त्वाचे राजकारण करणारा हा नेता आता तडजोडीचे राजकारण करण्यात आघाडीवर आहे.

आजपर्यंत या सर्व बाबींचा सार्वजनिक उहापोह केला नव्हता, परंतु कोणा एका व्यक्तीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये, यासाठी खुलासा करणे भाग पडले. पक्षाचे वरिष्ठ नेते सर्व बाबी विचारांत घेऊन योग्य उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देतील, असा विश्वास असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर शहर जिल्हा सरचिटणीस अनिल शेवते, जिल्हा सरचिटणीस विनोद बोथरा, भानुदास बेरड, नामदेव राऊत, कार्यालयीन चिटणीस जगन्नाथ निंबाळकर, चिटणीस युवराज पोटे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, जालिंदर वाकचौरे, शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गज्रे, राहुरी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, र्शीरामपूर शहराध्यक्ष मारुती बिंगले आदींच्या सह्या आहेत.