आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Issue At Nagar, Shirdi Lokasabh Matadar Sangh News , Divya Marathi

15 जूनपर्यंत खर्च सादर न केल्यास उमेदवार अपात्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी 15 जूनपर्यंत (निकालानंतर 30 दिवसांत) निवडणूक खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवाराला तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात येईल. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे दैनंदिन अंतिम हिशेब कसे सादर करायचे यासाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसाठी 7 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे शुक्रवारी दिली.

जिल्ह्यात दोन्ही नगर व शिर्डी मतदारसंघांत 17 एप्रिलला मतदान झाले होते. तर 16 मे रोजी मतमोजणी झाली. यात नगरमधून भाजपचे दिलीप गांधी, तर शिर्डीमधून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजय झाले होते. या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च 15 जूनपर्यंत सादर करावा, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी खर्च न सादर केल्यास तीन वर्षांसाठी ते अपात्र ठरतील, असेही कवडे यांनी सांगितले. दरम्यान, नगर शहर व जिल्ह्यात 16 ते 30 जून या कालावधीत मतदार पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे कवडे यांनी सागितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नाव नोंदणीबाबत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक अधिकारी सुनील माळी, राष्ट्रवादीचे किसन लोटके, उपजिल्हाधिकारी धनंजय कर्डक, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, पी. डी. गोसावी आदी उपस्थित होते. कवडे म्हणाले, जिल्ह्यात गुरुवार (29 मे) पासून मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदार नोंदणीसाठी विविध राजकीय पक्षांनी बीएलए यांची नेमणूक करावी. मतदार नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नाव नोंदणी करणा-यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. लोटके यांनी मतदार नोंदणीसाठी तहसील व तलाठी कार्यालयात केंद्र स्तरीय अधिका-यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.

तसेच एका पदाधिका-याने यादीत अल्पसंख्याक मतदारांची नावे चुकल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर सुनील माळी म्हणाले, मतदार नोंदणीचे फॉर्म आता मराठी व इंग्रजीतून भरता येतील. हे फॉर्म व्यवस्थित भरल्यास अडचण येणार नाही.