आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या दहा दिवस आधीच होणार चिठ्ठीवाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दहा दिवस अगोदरच मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीवाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिवारी दिली. निवडणूक कामकाजाची माहिती देण्यासाठी शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक लखमी गौतम हेही उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जनजागृती निरीक्षक म्हणून धमेंद्र तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) ते जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. काही तालुक्यांना भेटी देवून कमी मतदान झालेल्या गावांमध्ये केलेल्या उपाययोजनांचा आढावा ते घेणार आहेत, असेही जिल्हाधिकारी कवडे यांनी सांगितले.

निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर आयोगाची कडक नजर राहणार आहे. अवैध खर्च होत असल्यास तात्काळ थांबवला जावून कारवाई केली जाईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर देखरेख कक्ष स्थापन केला आहे. सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सभांचे छायाचित्रण केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण ३६ टीम नेमल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन व अवैध प्रचार रोखण्यासाठी तीन भरारी पथके नेमली आहेत.

महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात रोख रकमा, अवैध मद्य, शस्त्र व इतर बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक होऊ नये म्हणून विधानसभ मतदारसंघनिहाय तीन तपासणी नाके कार्यरत करण्यता आले आहेत. नागरिकांना खर्चविषयक तक्रारी नोंदवण्यासाठी सुविधा केंद्र नेमले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत २८ हजार ७४० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत तीन तक्रारी आल्या आहेत, तर दोन गुन्हे दाखल झाले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ७४९ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहेत. ४५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत २ गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत, तर २ आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. २ हजार ३२६ परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश काढले आहेत. तडीपारीचे ७२ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. विनाक्रमांकाच्या ४२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. श्रीरामपुरात फरार आरोपींचे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी यावेळी दिली.