आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Police And Revenue Department Try To Increase Voting Issue

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी झटणार पोलिस व महसूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या परिसरात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पोलिस व महसूल विभाग संयुक्तपणे जनजागृती करणार आहेत. यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी सज्ज झाले आहेत.
गेल्या वेळी मतदानाची कमी टक्केवारी असणार्‍या मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. या केंद्रांमध्ये मताचा टक्का वाढावा यासाठी महसूल व पोलिस प्रशासन जनजागृतीपर उपक्रम हाती घेणार आहे. निर्भयपणे मतदान करण्यास मतदारांनी बाहेर पडावे यासाठी पोलिस व महसूल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले, तर अशा परिसरात जनजागृतीपर फलक लावण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कामकाज सुरू आहे किंवा नाही याचा आढावा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून दररोज घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्यानुसार जिल्ह्याबाहेरील मनुष्यबळ मागवण्यात आले आहे. हे अतिरिक्त मनुष्यबळ दहा एप्रिलपर्यंत जिल्ह्यात दाखल होणार आहे. संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक या मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतील. उमेदवारांना प्रचार करण्यास आडकाठी आणणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी दिला आहे. शहरात जवळपास चारशे व्यक्तींना वॉरंट बजावल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.