आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरची जागा काँग्रेसकडेच - ब्रिजलाल सारडांना मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत मित्रपक्षाला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक पदाधिका-यांना दिला आहे. काँग्रेसच ही जागा लढवणार असून बाहेरचा उमेदवार न लादण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी सोमवारी दिली.

नाशिक येथे रविवारी (3 ऑगस्ट) झालेल्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यानंतर पदाधिका-यांशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी यावेळी उपस्थित होते. नगरची जागा राष्ट्र वादीला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या काही बाहेरील उमेदवारांनी शहरात शिरकाव करण्याचा सुरू केलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर सारडा बोलत होते. स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी घेताना बाहेरचा उमेदवार दिल्यास पराभव निश्चित असल्याचा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी नगरचीच नव्हे, तर राज्यातील कुठल्याच जागांची अदलाबदल होणार नसल्याचे सांगत स्थानिक उमेदवार देण्याचे आश्वासन दिले. शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महिला अध्यक्ष सविता मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी हवी : काळे
दरम्यान, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार आहे. या जागेसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करणार आहे, असे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

काळे म्हणाले, माझ्या घरात कोणी आमदार, खासदार नाहीत. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. माझी आई नोकरदार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांना घरी पाठवायचे असेल, तर माझ्यासारख्या सर्वसामान्यालाच उमेदवारी मिळायला हवी. राठोड यांनी 25 वर्षे नगरकरांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप करून ते म्हणाले, लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चळवळ उभी केली आहे. सर्वसामान्य नगरकरांनी त्याचे स्वागत केले आहे.

महापौर संग्राम जगताप यांनी माझ्या उमेदवारीच्या मागणीला पाठिंबा द्यावा, यासाठी सहका-यांसह त्यांची भेट घेणार आहे. पक्षाने त्यांच्या घरात आमदारकी, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या पदांबरोबरच संघटनेचे अध्यक्षपदही दिले आहे. त्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखववा, असेही काळे यांनी सांगितले.