आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना मिळणार दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा, "स्काडा' शोधणार वीज यंत्रणेतील बिघाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वीजवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास तो शोधण्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणने "सुपरव्हायजरी कंट्रोल अँड डाटा अॅक्विझिशन सिस्टिम' (स्काडा) ही अत्याधुनिक यंत्रणा आणली आहे. याद्वारे बिघाड शोधण्यासाठीचा वेळ तर वाचेल, शिवाय नागरिक, महावितरण कर्मचाऱ्यांना होणारा त्रास दूर होण्याची चिन्हे आहेत.

महावितरणचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्राच्या योजनेंतर्गत सोलापूर, सांगली, भांडूप, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मालेगाव, अमरावती या शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेचे नियंत्रण आणि माहिती संकलन करणारी "स्काडा' यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.

भविष्यात विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे "स्काडा" ही वितरण व्यवस्थेवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला. महावितरणच्या यंत्रणेत अनेक वेळा बिघाड निर्माण होतात; परंतु ग्राहक याबाबत अनभिज्ञ असतो. "स्काडा' ही अत्याधुिनक यंत्रणा ग्राहकाला बिघाडाबाबतची योग्य माहिती मिळवून देणार आहे.

पर्यायी व्यवस्था
एफटीआय (फॉल्टी ट्रॅफिक इंडिकेटर) अंतर्गत जिथे बिघाड झाला आहे. तेथे कोणत्या भागात कोणत्या ट्रान्सफॉर्मवरजवळ वा खांबाजवळ हा दोष उद्‌भवला आहे याची माहिती "स्काडा' केंद्रात स्क्रीनवर दिसेल. त्यानुसार तंत्रज्ञांना त्या ठिकाणावर पाठवून दोष दूर करण्यास मदत होईल. त्याचबरोबर वीज वितरण यंत्रणेत जादा विद्युतभारामुळे होणारा एखादा बिघाड होण्याची पूर्वसूचनाही ही यंत्रणा देईल; त्यामुळे प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे शक्य होईल.

स्थिर आणि नियमित वीज
ग्राहकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी "जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम'चा वापर होणार आहे. बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था केली जाईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळेल, स्थिर आणि नियमित दाबाने वीजपुरवठा होईल.