आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपासून धावणार विद्युत इंजिनची गाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर मार्चपासून विद्युत इंजिनावरची गाडी धावणार आहे. या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड ते सारोळादरम्यान विद्युत इंजिनाची मालगाडी दररोज धावत आहे. पुढील मार्गाचे किरकोळ काम त्यानंतर काही चाचण्या बाकी अाहेत. ते काम जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन मार्चपासून मनमाड ते दौंडदरम्यान विद्युत इंजिनाची रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. विद्युतीकरणामुळे या मार्गावरील प्रवासाचा किमान अर्धा ते पाऊण तास वेळ वाचणार आहे.
दौंड-मनमाड हा सुमारे १८० किलोमीटरचा मार्ग एकेरी आहे. त्यावरून फक्त डिझेल इंजिनच्या गाड्या धावू शकत असल्यामुळे प्रवासास मोठा वेळ लागतो. त्यामुळे पुण्याहून येणारी रेल्वे नगरला येण्यासाठी साडेतीन तास घेते. त्यात दौड रेल्वेस्टेशनवर इंजिनची दिशा पूर्ण बदलते. हा द्राविडी प्राणायम अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी या मार्गाचे विद्युतीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

सध्या मनमाडपासून पुढे पुण्यापासून मुंबईकडील मार्गांचे विद्युतीकरण आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांचे डिझेल इंजिन मनमाड किंवा भुसावळला बदलावे लागते. तेथे विद्युत इंजिन लावण्यात किमान २० मिनिटांचा वेळ वाया जातो. मुळात मनमाड भुसावळ स्टेशनवर गाड्यांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे या इंजिन बदलण्याच्या प्रक्रियेमुळे इतर गाड्यांना स्टेशनबाहेर थांबवून ठेवावे लागते. परिणामी त्यांनाही उशीर होतो. आता विद्युतीकरणामुळे इंजिन बदलावे लागणार नाही. परिणामी या स्टेशनवर गाड्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. अलीकडील काळात नगरहून दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा, कर्नाटक, हावडा, दरभंगा, वाराणसी झेलम एक्स्प्रेसला एकाच वेळी दोन डिझेल इंजिने लावावी लागत होती. कारण या गाड्यांच्या डब्यांची संख्या मोठी आहे. आता एकाच विद्युत इंजिनमुळे डिझेल खर्चात बचत तर होईलच, शिवाय गाडीचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

तीन वर्षांपूर्वी रेल्वेने मंजुरी देऊन हे काम सुरू झाले. लार्सन अँड टुब्रोला विद्युतीकरणाचे काम देण्यात आले. कंपनीने हे काम वेगात केले. रेल्वे सेफ्टीचे चेअरमन (सीआरएस) या मार्गाची स्वत: सर्व तपासणी केली. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून मनमाड ते सारोळादरम्यान विद्युत इंजिनची मालगाडी सुरू करण्यात आली. नगरला असलेल्या रेल्वे सुविधेच्या दृष्टीने विद्युतीकरण मैलाचा दगड ठरणार असल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

आता दुपदरीकरणावर जोर आवश्यक
विद्युतीकरण पूर्ण झाले, तरी रेल्वेचा वेग वाढणार नाही. त्यामुळे वेळेत बचतीचा अपेक्षित फायदा पूर्णपणे मिळणार नाही, असे मत रेल्वेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. विद्युतीकरणामुळे डिझेलची बचत प्रदूषणावर नियंत्रणाचे लाभ जरूर मिळतील. मात्र, दौंड-मनमाडदरम्यान एकेरी वाहतूक असल्याने दोन गाड्यांच्या ‘क्रॉसिंग’साठी गाड्या स्टेशनमध्ये थांबवाव्या लागतात. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे आता सर्व जोर या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी लावण्याची गरज आहे.

वेग वाढण्यासाठी ट्रॅक बदलावे लागणार
नगरमधून जाणारा रेल्वेमार्ग ब्रिटिशांनी तयार केला होता. लष्कराच्या महत्त्वाच्या केंद्रांमुळे ब्रिटिशांच्या दृष्टीने नगर शहर महत्त्वाचे होते. त्यांनी जो रेल्वेमार्ग तयार केला, त्यावर अनेक ठिकाणे वळणे आहेत. त्यातील एकही वळण रेल्वेला स्वातंत्र्यानंतर कमी करता आलेले नाही. रूळही ब्रिटिशांच्या काळातले आहेत. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवण्यावर मर्यादा येत आहेत. या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी वळणे काढून टाकणे रूळ बदलण्याची प्रक्रिया सुरू आवश्यक असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी देतात.

११८ गाड्यांचा वेळ होणार कमी
नगरहून सध्या दररोज २० गाड्या जातात. साप्ताहिक गाड्यांची संख्या ४८ आहे. त्यातील २८ गाड्या साप्ताहिक, आठ गाड्या आठवड्यातून दोनदा दहा गाड्या आठवड्यांतून तीनदा जातात. सुटीच्या काळात आठवड्यात १२ गाड्या जातात. त्यातून आठवड्यातून सुमारे पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय दररोज चार ते सहा मालगाड्याही जातात. या सर्व गाड्यांना या मार्गावरील विद्युतीकरणामुळे इंजिने बदलण्यात होणारा कालापव्यय टळण्याचा फायदा होणार आहे. विद्युत इंजिनची ताकद जास्त असल्याने विसापूर किंवा रांजणगाव येथे दोन इंजिने लावावी लागणार नाहीत.