आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरीत महावितरणच्या गलथानपणाचा निषेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमुख चौकात असलेल्या रोहित्राने बुधवारी (13 मार्च) रात्री अचानक पेट घेतला. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. महावितरणचे कर्मचारी उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणचा निषेध केला.

खडांबा नाका चौक नेहमीच गजबजलेला असतो. रोहित्रापासून दोन-तीन फूट अंतरावर दुकाने आहेत. शालेय विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. यापूर्वीही रोहित्राने पेट घेतला होता. त्यामुळे रोहित्र इतरत्र हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तत्कालीन मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.

रोहित्र पेटल्यानंतर नागरिकांनी तातडीने महावितरणशी संपर्क साधला. परंतु जेवण झाल्यानंतर आम्ही येऊ, असे कर्मचार्‍याने सांगितले. अग्निशमन यंत्रणेकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनीच आग शमवण्याचा प्रयत्न केला. ऑईलमुळे रोहित्राचा स्फोट होऊन मोठी हानी होण्याची शक्यता होती. गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी गावातील गडाख पेट्रोलपंपावरून आग शमवण्यासाठी सिलिंडर आणून आग शमवली. आग शमवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कुसमुडे, सचिन पटारे, संतोष पवार, दत्तात्रेय गडाख, अशोक गडाख, श्याम कोरडे आदींनी प्रयत्न केले. नंतर अध्र्या तासाने महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी घोषणा देऊन महावितरणच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला.

हेल्पालाईन कशासाठी
"आग लागल्यानंतर 101 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित अधिकार्‍याने प्रथम 100 क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्या क्रमांकावरून सूचना मिळाल्यानंतरच कार्यवाही करू असे बेजबाबदारपणाचे उत्तर मिळाले.’’
-अशोक कुसमुडे, ग्रामस्थ.