आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्यूजमध्ये तारांऐवजी टाकले सायकल स्पोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फकिरवाडा विभागांतर्गत येणार्‍या निर्मल परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विजेची समस्या होती. हाय व्होल्टेजमुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली. महावितरण कर्मचार्‍यांना फॉल्टच सापडत नव्हता. नेहमी शॉर्टसर्किट होत होते. (फ्यूज सारखा उडत होता) यावर उपाय म्हणून महावितरणच्या कर्मचार्‍यांनी फ्यूजमध्ये तारांऐवजी सायकलचे स्पोक टाकले, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वरिष्ठ मात्र अनभिज्ञ आहेत.

निर्मलनगर परिसर आणि पाऊलबुधे शाळेजवळ असलेल्या कमला अपार्टमेंट, बायजाबाई सोसायटीतील रहिवाशांचे हाय व्होल्टेजमुळे टिव्ही, झेरॉक्स मशिन, संगणक, युपीएस आणि होमथिएटर जळाले. याप्रकरणी येथील नागरिकांनी महावितरणच्या फकिरवाडा कार्यालयात तक्रारी केल्या.

महावितरण कर्मचारी येऊन पाहणी करत होते. मात्र, त्यांना फॉल्टच सापडत नव्हता. यामुळे नागरिक व कर्मचार्‍यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. फ्यूज उडतो म्हणून तारांऐवजी स्पोक टाकले. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. गेल्या आठ दिवसांपासून होणार्‍या या प्रकाराला या परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते. शनिवारी सकाळी पुन्हा जयकुमार खैरे यांनी फकिरवाडा कार्यालयात तक्रार दिली. कनिष्ठ अभियंता टी. एच. सौदागर यांनी कर्मचार्‍यांना पाठवून फॉल्ट शोधण्याचे सांगितले. कर्मचार्‍यांनी पूर्ण परिसरात चाचपणी केली. अखेर बायजाबाई सोसायटीत सर्व्हिस वायर आणि जीआय तार चिकटली होती. त्यांच्यात होत असलेल्या घर्षणामुळे हाय व्होल्टेज होत होते. यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळत होते. दरम्यान, फ्यूजमध्ये तारांऐवजी सायकलचे स्पोक का टाकले? याबाबत विचारले असता कनिष्ठ अभियंत्यांनी मात्र उत्तर देण्याचे टाळले.

आठ दिवसांनंतर सापडला फॉल्ट
झेरॉक्स मशिन, संगणक, होमथिएटर, युपीएस जळाले

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे युपीएसमधील ट्रान्सफॉर्मर आणि झेरॉक्स मशिनमधील एक पार्ट जळाला. या परिसरातील काहींचे संगणक, टिव्ही, होमथिएटर जळाले. याबाबत सोमवारी (13 जानेवारी) तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कर्मचार्‍यांनी पाहणी केली, त्यांना फॉल्ट सापडला नाही. यामुळे आम्ही त्रस्त झालो होतो. ’’ जयकुमार खैरे, रहिवासी, कमला अपार्टमेंट.

वीज पुरवठा सुरळीत
निर्मलनगर परिसरात विजेच्या समस्येबाबत आलेल्या तक्रारीनुसार कर्मचार्‍यांना संबंधित ठिकाणी पाठवून फॉल्ट शोधण्याचे सांगितले. तसेच आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येते. फकिरवाडा कार्यालय परिसरात कुठेही विजेसंदर्भात तक्रार नाही. ’’ टी. एच. सौदागर, कनिष्ठ अभियंता, फकिरवाडा उपकेंद्र.