आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरात बाप्पा अंधारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - गणेश विसर्जनाचा गेल्या वर्षीचा पेच लक्षात घेता यावेळी प्रवरा नदीपात्रात पाणी ठेवण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरकरांना दिल्याने बाप्पांवरील निम्मे विघ्न टळले. मात्र, गणेशोत्सव काळात भारनियमनाचा प्रश्न पूर्ण न सुटल्याने बाप्पांचा मुक्काम अंधारात राहण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके, प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शांतता समितीची दुसरी बैठक झाली. भारनियमन रद्द करा आणि गणेश विसर्जनावेळी नदीपात्रात पाणी असावे, या प्रमुख मागण्यांसाठी गणेश मंडळे आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी ठाम होते. नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट व विश्वास मुर्तडक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अँड. दिलीप साळगट, तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, शहरप्रमुख अमर कतारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, नगरसेवक कैलास वाकचौरे, अँड. श्रीराम गणपुले, किशोर पवार, जावेद जहागीरदार, राजेंद्र देशमुख, शौकत जहागीरदार, ओंकार भंडारी, शिरीष मुळे, जगदीश बद्दर, मुरारी देशपांडे आदींनी या बैठकीत भावना व्यक्त केल्या.

महावितरणने भारनियमन फीडरप्रमाणे न करता ज्यांची बिले थकली असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे कैलास वाकचौरे म्हणाले. प्रथम शासकीय कार्यालयांच्या थकलेल्या वीज जोडण्या तोडा आणि मगच सामान्य वीजग्राहकाला हात लावा. अधिकार्‍यांनीच काही खोडी काढली नाही, तर गणेशोत्सव शांततेत होईल, असे अँड. गणपुले म्हणाले. गेल्या वर्षी पाण्याची उधळपट्टी झाल्यानंतर गणेश विसर्जनावर पाण्याचे विघ्न आले होते. त्यामुळे याबाबत नियोजन करावे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. अधिकारी टोलवाटोलवी करीत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे जीव मुठीत धरून चालावे लागते. पोलिस नेमके काय करतात, असा प्रश्न मुरारी देशपांडे यांनी विचारला. अधिकार्‍यांनी अडचणीतून मार्ग काढला, तर प्रशासनाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. मात्र, असे घडले नाही, तर कोणाला गाडायचे याचा निर्णय जनताच रस्त्यावर उतरून घेईल, असा इशारा कुटे यांनी दिला.

शहराला ग्रामीणचा भाग जोडल्याबाबत खुलासा करण्याची मागणी थोरात यांनी केली. गेल्या वर्षीपासून भारनियमन सुरू झाल्याने शहरातील दोन फीडरवर भारनियमन होत आहे. पुढच्या महिन्यापर्यंत ते भारनियमनमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गोसावी यांनी दिली.

54 ठिकाणी कॅमेरे
भंडारदरा, निळवंडे भरलेले असल्याने विसर्जनाच्यावेळी गेल्या वर्षीसारखी समस्या उद्भवणार नाही. आवर्तनाचा कालावधी वाढवला जाईल. जिल्ह्यात 54 ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येथेही असे घडावे. उत्सवाबाबत सकारात्मक निर्णय होतील. ’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी.

स्वतंत्र वाहतूक शाखा
सप्टेंबरनंतर संगमनेरसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करणार आहे. यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. सीसीटीव्हीसाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्यांनी पुढाकार घ्यावा. उद्योजकांच्या मदतीतून हा प्रश्न सुटू शकतो. नदीपात्रात विसर्जनासाठी पाणी असावे. परंतु यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील.’’ रावसाहेब शिंदे, पोलिस अधीक्षक.