आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणकडून वीजग्राहकांची लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मनमानी पद्धतीने वीजबिल आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे, असा आरोप नगरकरांकडून केला जात आहे. या प्रकरणी नगरकरांनी सावेडी येथील कार्यालयात एकत्र येत महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारला. चुकीची बिले दुरुस्त करून मनमानी थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर महावितरणने रीडिंग चुकलेली बिले दुरुस्तीचे आश्वासन दिले.

महावितरणकडून मीटर रीडिंगची नोंद घेण्यासाठी विविध एजन्सींची नेमणूक केली जाते. वीजग्राहकांचे घर बंद असेल अथवा एजन्सीच्या प्रतिनिधीने रीडिंग घेतले नाही, तर अंदाजे रीडिंग देऊन बिले आकारली जातात. त्यामुळे सर्वसामान्य वीजग्राहकांची लूट होत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही ही लूट थांबलेली नाही. या प्रकारामुळे नगरकरांमधून संताप व्यक्त होत आहे. चुकीचे रीडिंग दाखवून जास्तीच्या रकमेची बिले आकारल्याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी सकाळी सावेडी येथील महावितरणच्या कार्यालयात एकत्र जमून अधिकार्‍यांना जाब विचारला. शहर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. ज्या ग्राहकांना चाळीस दिवसांची तसेच चुकीचे रीडिंग घेऊन जास्तीची बिले आकारली असतील ती बिले दुरुस्त करण्यात येतील. सप्टेंबरपासून विजेची दरवाढ झाली आहे, त्यामुळे ही बिले वाढीव आल्याचे दिसत आहे, असे भामरे यांनी नागरिकांना सांगितले.

एजन्सीला प्रत्येकी शंभर रुपये दंड
सप्टेंबरपासून विजेच्या दरात वाढ झाल्याने बिले जास्त आल्याचे दिसून येत आहे. परंतु नागरिकांना चुकीच्या पद्धतीने जास्तीची बिले आकारली असतील, तर संबंधित रीडिंग घेणार्‍या एजन्सीला प्रतिबिल शंभर रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी एका एजन्सीवर कारवाई केली आहे. सावेडीसाठी स्वतंत्र कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे.’’ धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता.

पारदर्शक कारभाराची अपेक्षा
नियमित वीजबिल केवळ सातशे रुपयांपर्यंत यायचे. पण दिवाळीनंतर दिलेल्या बिलात अतिरिक्त भार लावून नागरिकांची लूट केली. अतिरिक्त भाराची कल्पना न देता बिले वाढवून देणे चुकीचे आहे. महावितरणकडून पारदर्शक व्यवहाराची अपेक्षा आहे.’’ संदीप कांबळे, नगर.

ही तर ग्राहकांची फसवणूक
मागील महिन्यात अवघे 33 युनिट व 180 रुपयांचे बिल आले होते. त्यानंतर आचानक 575 युनिट दाखवून 5 हजार 248 रुपयांचे बिल आले. या बिलावर मीटरचा फोटो नाही. ही ग्राहकांची फसवणूक तसेच लूट आहे.’’ निवृत्ती बारस्कर, ग्राहक, नगर.