आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electrisity Robbery In Ahmedenagar By Ganesh Mandal

अहमदनगरात गणेश मंडळांकडून होते सर्रास वीजचोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी पोलिस, महापालिका, तसेच अधिकृत वीजजोडासाठी महावितरणकडून परवानगी घेणे प्रत्येक मंडळासाठी बंधनकारक आहे. परंतु या नियमाचे सर्वच मंडळांनी उल्लंघन केले आहे. परवान्यासाठी आतापर्यंत पोलिसांकडे 350, महापालिकेकडे 26, वाहतूक शाखेकडे 46, तर महावितरणकडे वीजजोडासाठी केवळ 18 मंडळांनी अर्ज केले आहेत. इतर सर्व मंडळांकडून सर्रास वीजचोरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात लहान-मोठय़ा गणेश मंडळांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. मात्र, फार थोड्या मंडळांनीच अधिकृत परवानगी घेतली आहे. अनेकांनी रस्त्याच्या मधोमध मंडप उभारल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका, पोलिस व महावितरण यांच्याकडून परवानगी व अधिकृत वीजजोडासाठी मंडळांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले. परंतु बहुतेक मंडळांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

गणेशोत्सवासाठी महावितरणने अत्यल्प दरात वीजजोड देण्याची सुविधा उपलब्ध केली असतानाही आतापर्यंत केवळ 18 मंडळांनीच अधिकृत वीजजोड घेतला आहे. एक किलोव्हॅटपर्यंत विजेचा वापर करणार्‍या मंडळांकडून फक्त एक हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येत आहे. तरीदेखील मंडळांकडून प्रतिसाद मिळत नाही. तेलीखुंट, दिल्लीगेट या भागातील मोठय़ा मंडळांना थ्री फेज, तर भिस्तबाग, पाइपलाइन, सावेडी, एमआयडीसी या भागातील मंडळांना महावितरणकडून सिंगल फेज कनेक्शन देण्यात आले आहे. एकीकडे राजकीय पक्षांच्या दबावामुळे उत्सव काळात भारनियमन रद्द करण्याचा निर्णय महावितरणला घ्यावा लागला, तर दुसरीकडे मंडळांकडून सर्रास वीजचोरी सुरू आहे. त्यामुळे महावितरणसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

..तर दंडात्मक कारवाई
ज्या गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतलेला नाही, अशा मंडळांना वीजजोड घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना प्रति युनिट 3.27 रुपये दराने वीज देण्यात येत आहे. जी मंडळे अधिकृत वीजजोड घेणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-डी. जे. माने, उपकार्यकारी अभियंता, नगर शहर.

मनपाकडून नियोजन
गणेशोत्सवात अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येईल.
- सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख, मनपा.