आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुलेखक स्थानांतरण; तांत्रिक अडचणीचा खोडा, नियमानुसार स्थानांतरण करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेत एकाच विभागात पाचपेक्षा अधिक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे स्थानांतरण करण्यात आले. तथापि, अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या स्वीय सहायकांसह इतर काही लघुलेखकांचे स्थानांतरण नियमात असतानाही करता आले नाही. यामागे तांत्रिक अडचण असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. तथापि, तांत्रिक अडचण कोणती हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणा-या कर्मचाऱ्यांचे एका विभागातून दुस-या विभागात स्थानांतरण केले जाते. त्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त एकाच विभागात, तसेच एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण जिल्हा परिषदेने केले आहे. त्यानुसार कृषी विभागातील सोमनाथ भिटे यांचे शिक्षण विभागात, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील व्ही. व्ही. कातोरे यांचे यांचे पशुसंवर्धन विभागात, शिक्षण विभागातील ए. के. जाधव, वाय. डी. वारुळे, एम. पी. शिंदे यांचे सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागात, बांधकाम विभागातील एस. एम. देशमुख, डी. के. माळशीकर यांचे पाणी पुरवठा विभागात स्थानांतरण करण्यात आले. स्थानांतरणाचा नियम सर्वांना सारखाच असेल, तर अध्यक्षांच्या स्वीय सहायकांसह इतर स्थानांतरणास पात्र असलेल्या स्वीय सहायकांचेही (लघुलेखक) स्थानांतरण होणे अपेक्षित आहे. सध्या जिल्हा परिषदेत ५ लघुलेखक आहेत. त्यापैकी जिल्हा परिषद अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वरिष्ठ लघुलेखकाची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त समाजकल्याण सभापतींकडे एक लघुलेखक, अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतींकडे एक लघुलेखक व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एक लघुलेखक कार्यरत आहे. वास्तविक सभापतींना स्वीय सहायक म्हणून लिपिकाला घेता येते. आयुक्तांकडून मंजुरी घेतल्यानंतर लघुलेखकाला स्वीय सहायक म्हणून घेता येते. असे प्रशासनाचे म्हणने आहे.
तथापि, महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या लघुलेखकांना स्वीय सहायक बनवण्याचा फंडा वापरला जात आहे. अध्यक्षांच्या लघू लेखकाने सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेचे इतिवृत्त द्यावे, तसेच सामान्य प्रशासन विभागाने एका लघुलेखकाकडे प्रत्येकी तीन ते चार विषय समित्या वाटप करून जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेत मनमानी पद्धतीने स्थानांतरण प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप काही सदस्यांकडून होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे वरिष्ठ लघुलेखक देणे आवश्यक असले, तरी जिल्हा परिषदेत दोन वरिष्ठ लघुलेखक आहे. त्यांच्यात परस्पर स्थानांतरण करता येणे शक्य आहे. मात्र, तांत्रिक अडचण असल्याचे खासगीत सांगून कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष गुंड यासंदर्भात कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अधिकारी नॉट रिचेबल
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, संपर्क न झाल्याने तांत्रिक अडचण गुलदस्त्यातच राहिली असून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कर्मचारी बदलतात स्वीय सहायक का नाही?
दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मग स्वीय सहायकांच्या बदल्या करायला काय अडचण आहे. स्थानांतरणाचे नियम प्रशासनाने जबाबदारीने सर्वांना सारखेच लावावेत.' बाळासाहेब हराळ, सदस्य, जिल्हा परिषद.