आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० लाखांची टाकी १० वर्षांपासून कोरडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(५० लाख रुपये खर्च करून फुलसौंदर मळा येथे दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या उंच टाकीची सध्या वापराविना अशी दुरवस्था झाली आहे. छाया: उदय जोशी.)
नगर - फुलसौंदरमळा येथे ५० लाख खर्च करून उभारण्यात आलेली पाण्याची उंच टाकी गेल्या दहा वर्षांपासून कोरडीठाक आहे. नगरकरांच्या पैशांची महापालिकेकडून कशी उधळपट्टी होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे तब्बल ११ लाख लिटर क्षमता असलेल्या या टाकीच्या परिसरात अनेक वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. मनपाच्या या भोंगळ कारभारा विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

महापालिकेचा १२ वा स्थापना दिन नुकताच साजरा झाला. महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी नगरकरांसाठी बुरूडगाव रस्त्यावरील फुलसौंदर मळा येथे पाण्याची उंच टाकी बांधण्यात आली. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या कार्यकाळातील हे मोठे विकासकाम होते. परंतु पुढे महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर हेच विकासकाम निकामी ठरवण्यात आले. टाकीच्या बांधकामासाठी त्यावेळी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले, परंतु दहा वर्षे झाली, तरी या टाकीत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे टाकीवर झालेला लाखो रुपयांचा खर्च, तर वाया गेलाच, शिवाय टाकीच्या परिसरातील सारसनगरसारख्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरवर आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. टाकीचा वापर झाला असता, तर टँकरवर झालेला हा खर्च वाचला असता, परंतु मनपा अधिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सध्या या टाकीची मोठी दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिक टाकीच्या छताचा वापर गुरांचा गोठा म्हणून करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ही टाकी दुर्लक्षित आहे, परंतु आता शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकीचा वापर करण्यात येईल, असा दावा महापालिका करत आहे. परंतु आतापर्यंत पाणी सोडल्याने ही टाकी कायमची निकामी होण्याची शक्यता आहे. उंच टाक्यांच्या बांधकामानंतर त्या पाण्याने भरून ठेवणे आवश्यक असते. तसे झाल्यास या टाक्यांना तडे जातात. फुलसौंदर मळ्यातील टाकीची देखील अशीच स्थिती आहे. एकीकडे शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली आहे, तर दुसरीकडे महापालिका उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करत नाही. मनपाच्या या भोंगळ कारभाराविरोधात नगरकर संताप व्यक्त करत आहेत. तब्बल ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली फुलसौंदर मळ्यातील टाकी कायमची निकामी झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.

११ - लाख लिटर क्षमता
५० - लाख टाकीवर खर्च

पाणीप्रश्न जैसे थे
नगरशहराचा विस्तार वाढला आहे. त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत हाती घेतलेल्या ११६ कोटींच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. कामातील अनियमितता पाहता योजना कार्यान्वित झाली, तरी नगरकरांना पुरेसे पाणी मिळेल, याबाबत शंकाच आहे.

... तर वाचले असते लाखो रुपये
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी मोठे प्रयत्न करून उंच टाकी उभारली. परंतु दहा वर्षे उलटली, तरी टाकीत पाणी सोडण्यात आलेले नाही. टाकीचा वापर झाला असता, तर परिसरात टँकरवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला असता. टाकीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.'' भगवानफुलसौंदर, प्रथममहापौर.

सुधारित पाणी योजनेसाठी वापर
फुलसौंदरमळा येथे काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या टाकीचा वापर करण्यात आलेला नाही. परंतु आता शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी या टाकीचा वापर होणार आहे. योजना सुरू करतानाच ही टाकी गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यामुळे टाकीवर झालेला खर्च वाया जाणार नाही.'' परिमलनिकम, पाणीपुरवठाविभागप्रमुख.