आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण निर्मूलन गवंडी, सुतारांच्या हाती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालय प्रभाग समिती स्तरावर पथक स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. येथील महापालिका प्रशासनाने मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन पथकाचे बीट निरीक्षक मुकादम म्हणून प्रशासनाने चक्क स्वच्छता निरीक्षक गवंडी सुतारांची नेमणूक केली आहे. महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभारामुळेे शहरातील अतिक्रमण निर्मूलनाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अस्तित्व मागील काही वर्षांपासून संपुष्टात आले आहे. शासन निर्णयानुसार अतिक्रमण काढण्याचे अधिकार आता प्रभाग समिती कार्यालयाला देण्यात आले आहेत. मात्र, बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, विद्युत या विभागांचे स्वतंत्र अस्तित्व अजूनही कायम असल्याने शहरातील चार प्रभाग समिती कार्यालयांची अवस्था पंख छाटलेल्या पक्ष्याप्रमाणे झाली आहे. शहरातील अतिक्रमण नियंत्रण निर्मूलनासाठी महापालिका मुख्यालय प्रभाग समिती स्तरावर पथक स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मुख्यालय स्तरावरील पथक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली, तर प्रभाग समिती स्तरावरील पथक सहायक आयुक्त अथवा प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असणे बंधनकारक आहे. दोन्ही पथकांसाठी आवश्यक मनुष्यबळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. परंतु प्रशासनाने पथकाचे बीट निरीक्षक मुकादम म्हणून चक्क गवंडी सुतारांची नेमणूक केली.

प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे शहरातील अतिक्रमण निर्मुलनाचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक गंभीर झाला आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. प्रशासनाकडून वर्षभरात एखाद्या वेळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येते, परंतु ही मोहीम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येते. त्यासाठी अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन पथक अधिक सक्षम करण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाने शासनाच्या आदेशाला हरताळ फासत गवंडी सुतारांची नेमणूक करून हे पथक अकार्यक्षम करून ठेवले. परिणामी शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

तांत्रिक कर्मचाऱ्यांची वानवा
अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन पथकाचे बीट निरीक्षक मुकादम म्हणून गवंडी सुतारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, अतिक्रमणे जागेच्या मोजमापाबाबत तांत्रिक माहिती असलेला एकही अभियंता पथकात नसल्याने कारवाईत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हे पथक आता केवळ नावापुरतेच उरले आहे. परिणामी अतिक्रमणांच्या तक्रारींत मोठी वाढ होत आहे. हे पथक कार्यक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी करत आहेत.

अतिरिक्त कामाचा कर्मचाऱ्यांवर भार
प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन पथकाची स्थापना झाली असली, तरी पथकातील कर्मचाऱ्यांना अतिक्रमणाच्या कामाऐवजी हगणदारीमुक्तीचा सर्व्हे, मालमत्ता कराची वसुली, तसेच ड्रेनेज, नळजोड, गटार यासारख्या नागरी समस्या सोडवण्यासाठी धावपळ करावी लागते. मालमत्ता कराची बिले तयार करून ती वेळेत वितरित करणे, वारंवार होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे अशी जास्तीची कामे करावी लागतात.