आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनखात्याच्या दक्षतेमुळे उधळला गेला अतिक्रमणांचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दक्षतेमुळे नगरपासून सुमारे बारा किलोमीटरवरील विळद परिसरातील वनजमिनीवर आंदोलनाद्वारे अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न बुधवारी उधळण्यात आला. आंदोलनकर्त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलिस व वन कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

वन विभागाच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या कसण्यासाठी बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला होता. वन विभागाच्या विळद येथील सर्व्हे क्रमांक 199 मध्ये अतिक्रमण आंदोलन करण्यात येणार होते. गेल्या आठवड्यात अकोले येथे झालेल्या अशाच प्रकारच्या आंदोलनात मोठा गोंधळ उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला तोंड देण्यासाठी नगरमध्ये नुकतेच नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांनी वन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सज्ज ठेवले होते. सकाळपासूनच वन विभागाचे उपवनसंरक्षक चव्हाण, सहायक वनसंरक्षक सुरेश दोंड, अरुण येलजाळे, बी. आर. कदम, वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे, लक्ष्मण बांबरसे, संतोष बोराडे, भाऊसाहेब गिते आदी अधिकार्‍यांसह वनपाल, वनरक्षक व वनमजूर असे 120 कर्मचारी, तसेच एक सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक व 40 पोलिस कर्मचार्‍यांचा ताफा विळद येथे तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना अटक करून नेण्यासाठी एक खासगी बसही तयार ठेवण्यात आली होती. वन कर्मचारी व पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे आंदोलनकर्ते विळद परिसरात फिरकलेच नाहीत.

आंदोलनकर्त्यांचा एक गट संगमनेरला जाऊन तेथे त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.