आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण हटावला पुन्हा गती, शहरातील हजारो फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने शुक्रवारी पुन्हा गती घेतली. उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून शहराच्या विविध भागांत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू आहे. चार दिवसांपासून ही कारवाई थंडावली होती.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. माळीवाडा, माणिक चौक, विशाल गणेश मंदिर, पंचपीर चावडी, हातमपुरा, गंजबाजार, कापडबाजार, चितळे रस्ता, दिल्लीगेट, तारकपूर, टिळक रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग नाका, पाइपलाइन रस्ता, केडगाव आदी ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, चारठाणकर रजेवर गेल्यानंतर ही मोहीम थंडावली होती. या मोहिमेला प्रभाग अधिका-यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे केली होती.
आयुक्तांनी प्रभाग अधिका-यांची कानउघाडणी केल्यानंतर मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. इथापे यांनी प्रभाग अधिका-यांसह पुन्हा विविध भागांतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. मोहीम सुरू असली, तरी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी सर्वसमावेशक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. नगरकरांनी मोहिमेचे स्वागत केले असून उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी अधिका-यांचा सत्कार होत आहे. विविध संघटनांकडून पथकाचा सत्कार होत असल्याने प्रशासनाला मोठे पाठबळ मिळाले आहे.

अमरधामसमोरील भाजीबाजारापासून सुरुवात करून नेप्ती चौकातील अतिक्रमणे पथकाकडून हटवण्यात आली. मध्यंतरी थंडावलेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारक निर्धास्त झाले होते.
मोहिमेने पुन्हा उचल घेतल्याने अतिक्रमणधारक धास्तावले आहेत.

मनपा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
नेप्ती चौकातील अतिक्रमणे हटवताना पथकाने महापालिकेच्या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्ष केले. कालबाह्य झालेला जकातनाका अतिक्रमणात असूनही पाडण्यात आला नाही. मात्र, त्याच्या शेजारी असणा-या टप-या हटवण्यात आल्या. पथकाच्या या कृतीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

एन डी स्क्वॉडची प्रतीक्षा
पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी मनपाने एनडी स्क्वॉड स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रत्येकी ६ माजी निवृत्त सैनिकांचा समावेश असलेली तीन पथके तैनात करण्यात येणार आहेत. अतिक्रमण करणा-यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे काम या पथकाकडून होणार आहे. लवकरच ही पथके कार्यान्वित होणार होती, परंतु अद्याप पथके तयार करण्यात आलेली नाहीत.

पक्की अतिक्रमणे पाडू
महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे. पक्क्या बांधकामांची अतिक्रमणेही हटवण्याचे नियोजन सुरू आहे. अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, याची काळजी घेण्यात येत आहे.'' सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख.