आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते झाले मोकळे..., मनपा प्रशासनाचे नगरकरांकडून कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाने राबवलेल्या अतिक्रमण हटाव माेहीमेमुळे शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. प्रशासनाने प्रथमच राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई केली. त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. माळीवाडा, माणिक चौक, विशाल गणेश मंदिर परिसर, पंचपीर चावडी, हातमपुरा, गंजबाजार, कापडबाजार, चितळे रोड, दिल्ली गेट, तारकपूर, टिळक रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग नाका, पाइपलान रोड, केडगाव आदी ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. उपायुक्त चारठाणकर हे गेल्या पंधरा दिवसांपासून स्वत: कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे अतिक्रमणधारकांची समजूत काढणे, वेळप्रसंगी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका अनेक नागरिकांनी मोहिमेचे स्वागत करत चारठाणकर यांचा सत्कार केला. अतिक्रमणधारकांनी मात्र या मोहिमेचा धसका घेतला आहे. ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढले, तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. त्यामुळे अनेकांनी पुन्हा अतिक्रमण करण्याचे धाडस दाखवले नाही, परिणामी अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास या मोहिमेचा मोठा हातभार लागला,त्यामुळे नागरिकांनी मनपा प्रशासनाचे कौतुक केले आहे.

एनडी स्कॉडची नजर
पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी मनपाने उपायुक्त चारठाणकर यांच्या पुढाकारातून एनडी स्कॉडची निर्मिती केली आहे. त्यात प्रत्येकी ६ माजी निवृत्त सैनिकांचे तीन पथके अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यामुळे यापुढे देखील शहरातील रस्ते मोकळेच राहणार आहेत.

विरोध मोडून काढला
अतिक्रमण हटाव मोहिमेला शहरातील फेरीवाल्यांसह संघटनांनीही विरोध दर्शवला. परंतु उपायुक्त चारठाणकर यांनी विरोध मोडून काढत कारवाई सुरू ठेवली. त्यामुळे फेरीवाले व हातगाडीवाल्यांत दहशत निर्माण झाली आहे. अतिक्रमण होणार नाही, यासाठी चारठाणकर प्रयत्नशील आहेत.