आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहीम : सावेडीतील रस्त्यांनीही घेतला मोकळा श्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या मध्यवर्ती भागानंतर आता उपनगरांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. सावेडी उपनगरात मंगळवारी दविसभर मोहीम राबवण्यात आली. तारकपूर, तहसील कार्यालय, प्रोफेसर कॉलनी, कुष्ठधाम रस्ता आदी भागांतील पक्की अतिक्रमणे पाडण्यात आली. अतिक्रमणधारकांनी महापालिकेच्या या मोहिमेचा चांगला धसका घेतला आहे. अनेकांनी कारवाईपूर्वीच आपली अतिक्रमणे काढून घेतली. प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने मागील दोन आठवड्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त अजय चारठाणकर व भालचंद्र बेहेरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला प्रथमच यश मिळाले. आतापर्यंत हजारो टपऱ्या, हातगाड्या व पक्की अतिक्रमणे हटवण्यात आली. माळीवाडा परिसरातून सुरू झालेली ही मोहीम आता उपनगरांत पोहोचली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दविसापासून सर्वसमावेश कारवाई करण्यात येत असल्याने मोहीम फत्ते झाली आहे. माळीवाडा, विशाल गणेश मंदिर परिसर, पंचपीर चावडी, हातमपुरा, चितळे रस्ता, टिळक रस्ता, कापडबाजार, गंजबाजार, दिल्ली दरवाजा आदी ठिकाणची अतिक्रमणे हटवण्यात आली. पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटवले, तेथे पुन्हा अद्याप अतिक्रमण झालेले नाही.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई झाल्याने नगरकर समाधान व्यक्त करत आहेत. फेरीवाले, भाजीवाले, खाद्यपदार्थ व चहाच्या टपऱ्या, तसेच दुकानांच्या फलकांनी शहरातील रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. या कारवाईमुळे शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असल्याने अतिक्रमणधारकांचा फारसा विरोध झाला नाही. उलट कारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी आपले अतिक्रमण स्वत:च काढून घेतली आहेत. अतिक्रमण काढू नये, यासाठी अनेकजण फोनाफोनी करून राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आयुक्त कुलकर्णी यांनी राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई सुरूच ठेवली आहे.
भीतीपोटी विरोध नाही
सावेडी उपनगरातील विविध भागात मंगळवारी दविसभर कारवाई करण्यात आली. तारकपूरकडून मिस्कीन मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्र्याचे शेड, ओटे व पायऱ्या जेसीबीद्वारे पाडण्यात आल्या. प्रोफेसर कॉलनी चौक, तसेच पटवर्धन स्मारकाजवळ काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभे केले होते. तेदेखील पाडण्यात आले. सायंकाळी सहापर्यंत भिस्तबाग परिसरात कारवाई सुरू होती. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने कोणीही कारवाईस विरोध केला नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करणार