नगर- महापालिका प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुरुवारी ब्रेक देण्यात आला. त्यामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. पूजा साहित्याचे स्टॉल भररस्त्यात लागले होते.
दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा ही मोहीम सुरू होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.
मागील आठ दिवसांत अनेक रस्त्यांवरील टपऱ्या, हातगाड्या, तसेच पक्की अतिक्रमणे काढण्यात आली. मकर संक्रांतीच्या दिवशी मोहीम सुरू राहिली, तर अनेकांची गैरसोय होणार होती.
फेरीवाल्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. मकर संक्रांतीला कारवाई बंद ठेवल्याने फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाला.
आतापर्यंत माळीवाडा, हातमपुरा, गंजबाजार, टिळक रस्ता, पंचपीर चावडी आदी भागातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. परंतु अनेकांनी या भागात पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून पुन्हा याच भागात कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईस विराेध करणाऱ्या काही अतिक्रमणधारकांच्या विरोधात प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. हॉकर्स सेवा संघाने या कारवाईस विरोध दर्शवला, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत कारवाई सुरूच ठेवली. शुक्रवारपासून पुन्हा कारवाई सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.