आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशाने महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली आहे. गल्लोगल्ली असलेला अतिक्रमणांचा विळखा अजून कायम आहे. मागील महिन्यात अतिक्रमणे हटवून मोकळ्या झालेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे मनपाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी मनपाने मोठा गाजावाजा करीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. डीएसपी चौक, कोठला ते केडगावपर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली. मनमाड, औरंगाबाद व पुणे मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच तारकपूर, कापडबाजार, सर्जेपुरा, घासगल्ली या भागांतील अतिक्रमणेही काढण्यात आली. बालिकाश्रम रस्त्यावरील धडाकेबाज मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुद्द पालकमंत्रीच पाठीशी असल्याने मनपाने या विरोधाला भीक घातली नाही. तथापि, नंतर दाळमंडई व दिल्ली दरवाजा ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील अतिक्रमणे हटवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली असून ती पुन्हा कधी सुरू होणार हे गुलदस्त्यातच आहे.
शहर, सावेडी, झेंडीगेट व केडगाव या चारही विभागांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून ती कधी हटवणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर, तर काही ठिकाणी रस्त्यातच दुकाने थाटण्यात आली आहेत. माळीवाडा व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ व अन्य वस्तुंची दुकाने थाटण्यात आली आहेत. कापड बाजार, सर्जेपुरा, घासगल्ली येथील अतिक्रमणे हटवण्यात आली असली, तरी हातगाड्या परत आल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. दिल्ली दरवाजा परिसरातही खाद्यपदार्थ व अन्य दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर तर नेहमीच अशी दुकाने थाटलेली असतात. विद्यार्थ्यांची गर्दी व वाहनांची कोंडी यामुळे तेथे नेहमीच लहान-मोठे अपघात होतात.
सावेडीतील भिस्तबाग नाक्यावर भाजीविक्रेते दररोज सायंकाळी पथारी मांडतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहकही रस्त्यावरच वाहने लावतात. अतिक्रमण विभागाने येथील भाजीविक्रेत्यांवर अनेकदा कारवाई केली, पण मागचे पाढे पंचावन्न.
शहरातील चौपाटी कारंजा, चितळे रस्ता, कोर्ट परिसर, कापड बाजार, सर्जेपुरा, टीव्ही सेंटर, झोपडी कॅन्टीन, भिस्तबाग नाका, बुरूडगाव रस्ता, तारकपूर बसस्थानक आदी भागांत पक्क्या बांधकामांबरोबरच टप-यांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रशासन पथारीवाल्यांकडून रोज 10 ते 50 रुपयांपर्यंतची वसुली करते. अतिक्रमणधारकाला हे पैसे देणे परवडते. मनपाचे काही कर्मचारी अतिक्रमणधारकांकडून हप्ते वसुली करीत असल्याचीही चर्चा आहे. रस्ता बाजू शुल्क आता साई पेस्ट कंट्रोल या खासगी संस्थेमार्फत वसूल करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.