नगर- विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढावी, यासाठी सारडा महाविद्यालयात उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगावी, यासाठी नगर सुपा एमआयडीसीतील यशस्वी उद्योजकांकडून उद्योजकता विकास शिबिरांतर्गत सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे, असे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. मधुसूदन मुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. मुळे यांच्या हस्ते बहुउद्देशीय सभागृहात झाले. यावेळी मंडळाचे सचिव सुनील रामदासी, कार्याध्यक्ष शिरीष मोडक, प्राचार्य डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, सुजाता काळे, प्रबंधक अशोक असेरी आदी उपस्थित होते. कमी खर्चात तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक, तसेच टिकाऊ शोभिवंत वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
शिरीष मोडक, डॉ. राजेंद्र शिंदे, सुजाता काळे आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. रेखी यांनी सांगितले, कौशल्य संवर्धन आणि उद्योजकता विकास कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना दिली जात आहे. आयएमएस संस्थेतर्फे घेण्यात येत असलेल्या उद्योजकता कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्या मार्फतच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा शिबिरांतून मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रास्तविक शिबिराचे समन्वयक प्रा.अविनाश झरेकर यांनी केले, तर आभार अनिता भालेराव यांनी मानले.