आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environment And Wildlife,Latest News In Divya Marathi

‘सँक्चुरी आशिया’च्या मुखपृष्ठावर साबळे यांचे छायाचित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतातील पर्यावरण व वाईल्ड लाईफवरील अग्रगण्य व प्रसिद्ध असलेल्या ‘सँक्चुरी आशिया’ या मासिकाच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठासाठी नगरचे वृत्तछायाचित्रकार मंदार साबळे यांच्या एक जुलै रोजी कोल्हार येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याचे छायाचित्र निवडले गेले. ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ द राईझ’ या मथळ्याखाली हे छायाचित्र मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात आले आहे. असा बहुमान मिळालेले ते जिल्ह्यातील पहिले छायाचित्रकार आहेत.

जिल्ह्यात जवळजवळ सर्व तालुक्यांत बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे बिबटे-मानव संघर्षाची धार मोठी आहे. हे बिबटे मानवी वस्तीजवळ वावरतात. प्रामुख्याने उसाचे पीक असलेल्या शेतांत त्यांचे प्रजननही होते. त्यामुळे अन्नासाठी मानवी वस्तीजवळ त्यांचा वावर असतो. बहुतांश शेतांतील विहिरींना कठडे नसल्याने रात्री कोंबड्या, कुत्री व भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडण्याचे मोठे प्रमाण आहे. यामुळे कित्येकदा बिबट्यांना प्राणास मुकावे लागले आहे. घटना लगेच समजली, तर त्यांना वाचवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी अक्षरश: जीवावर उदार होऊन प्रयत्न करतात. त्यांच्याकडे तशी अत्याधुनिक सामग्रीही नसते. तरीही उपलब्ध साधनांद्वारे विहिरीत पडलेल्या अनेक बिबट्यांना वन विभागाने वाचवले आहे. बिबट्यांना विहिरीतून जिवंत बाहेर काढण्यासाठी वन विभागाला मोठी कसरत करावी लागते.
साबळे यांनी अशाच एका कसरतीचे छायाचित्र काढले होते. ही घटना राहाता तालुक्यातील कोल्हार येथील आहे. दोरीच्या बाजेच्या साह्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले होते. या घटनेचा लेख या अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘सँक्चुरी आशिया’ हे भारतातील पर्यावरण व वन्यजीवविषयक लेखन प्रसिद्ध करणारे मासिक आहे. वन्यजीव संरक्षणात हे मासिक महत्त्वाची भूमिका बजावते. मुखपृष्ठावर साबळे यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून या मासिकाने त्यांचा सन्मान केला आहे.
फेसबुक’ने दिली ओळख
साबळे यांच्या फेसबुक अकाउंटवर बिबट्याची अनेक छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे पाहून ‘सँक्चुरी आशिया’च्या लोकांनी याबाबत साबळे यांच्याशी संपर्क साधला व संबंधित छायाचित्र प्रकाशित करण्याची परवानगी मागितली. या आधीही साबळे यांच्या अनेक छायाचित्रांना राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत.