आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environmental Conservation News In Nagar, Divya Marathi

पर्यावरण संवर्धनासाठी सिना नदीच्या काठी होणार बीजारोपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कार्य करणा-या हरियाली संस्थेच्या माध्यमातून शहरातून वाहणा-या सिना नदीकाठी यंदा बीजारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थेने तीन लाख बियांचे संकलन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी दिली.

वायू व ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी सुशोभीकरण, आॅक्सिजन निर्मिती, सावली, मनोरंजन व पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक वृक्षलागवडीची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरातून जाणा-या सिना नदीकाठी व मोठ्या नाल्यांच्या दुतर्फा बीजारोपण करून ‘ग्रीन बेल्ट’ विकसित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी हरियाली संस्थेने तीन लाख बियांचे संकलन केले आहे.

संकलित केलेल्या बियांमध्ये दुर्मिळ प्रजातीच्या बहावा, रानभेंडी, रिठा, तामण, शिवण, काटेसावरी, पांगरा अशा सात वृक्षांच्या बिया आहेत. देशी वृक्षांमध्ये भोकर, कडुनिंब, चिंच, करंज, काशिद, सिसू या प्रजाती आहेत, तर परदेशी वृक्षांपैकी गुलमोहोर, नीलमोहोर, रानमोहोर, रेन ट्री या चार प्रजातींसह एकूण 16 प्रजातींच्या बियांचा समावेश आहे. जागतिक वृक्षारोपण दिनाचे (1 जून) औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे खामकर यांनी सांगितले.

हरियाली संस्थेकडून दरवर्षी बीजारोपणाचा उपक्रम राबवण्यात येतो. शहरातील इतर काही पर्यावरणप्रेमी संघटनाही दरवर्षी बीजारोपण करतात. मागील वर्षी या उपक्रमांतर्गत शहर परिसरात लाखो बियांचे बीजारोपण करण्यात आले. त्यामुळे नगर शहरातील पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागत आहे.

या वर्षीही बीजारोपण करण्यात येईल. त्यासाठी हरियालीसारख्या अनेक संस्था व संघटना पुढे आल्या आहेत, ही शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहे.