आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Escort Recovery At Ahemdnagar Municipal Corporation

नाक्यांवरील जुलमी वसुली थांबेना; तक्रारींना प्रशासनाकडून केराची टोपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका हद्दीतील पारगमन शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या ‘मॅक्स लिंक’नेही पूर्वीच्या ठेकेदाराप्रमाणेच जुलमी वसुलीचे सूत्र अवलंबून ट्रकचालकांची पिळवणूक सुरू केली आहे. ‘दिव्य मराठी’ने सोमवारी काही ट्रकचालकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पारगमन नाक्यांवरील कर्मचारी दमदाटी करून 100 व 60 ऐवजी चक्क 250 रुपयांची सरसकट वसुली करीत असल्याचे ट्रकचालकांनी सांगितले. पैसे दिल्यानंतर देण्यात येणार्‍या पावत्यांचे रकानेही कोरे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे याबाबत मनपाकडे दिलेल्या तक्रारींना अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवून ठेकेदार संस्थेला पाठबळ दिले असल्याचेही स्पष्ट झाले.

महापालिका हद्दीत गेल्या वर्षी जकात व पारगमन शुल्क वसूल करणार्‍या विपुल ऑक्ट्रॉय एजन्सी या ठेकेदार संस्थेच्या कर्मचार्‍यांनी ट्रकचालकांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक केली. एवढेच नाही तर जकातीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची औषधे अडवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. अखेर विपुलची मक्तेदारी 1 जानेवारीला संपुष्टात येऊन मॅक्स लिंकला पारगमनचा ठेका देण्यात आला. आतातरी पारगमन नाक्यांवरील पिळवणूक थांबेल, अशी ट्रकचालकांना अपेक्षा होती. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच नाक्यांवर पुन्हा पिळवणूक सुरू झाल्याने ट्रकचालक हवालदिल झाले आहेत. याबाबत काही ट्रकचालकांनी मनपाकडे तक्रारीही केल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सोमवारी औरंगाबाद महामार्गावरील पारगमन नाक्यावर काही ट्रकचालकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. ठेकेदार संस्थेने प्रत्येक नाक्यावर जास्तीची वसुली करण्यासाठी दहा-बारा कर्मचारी ठेवले आहेत. हे कर्मचारी ट्रकचालकांकडून जास्त पैशांची मागणी करतात. पैसे नाही दिले, तर सर्वजण मिळून ट्रकचालकाला दमदाटी, वेळप्रसंगी मारहाणही करतात. नियमानुसार ट्रकचालकांकडून 100 व 60 रुपये पारगमन शुल्क घेणे बंधनकारक आहे. मात्र, हे कर्मचारी सर्व ट्रकचालकांकडून सरसकट 250 रुपये वसूल करतात. प्रत्येक कर्मचार्‍याच्या खिशात पावतीपुस्तक असते. पैसे दिल्यानंतर पावती दिली जाते, परंतु पावतीवर मालाचे वर्णन, नगाची संख्या, वजन, पारगमनची रक्कम व पारगमन अधिकार्‍याची सही नसते. याबाबत एखाद्या ट्रकचालकाने विचारले, तर त्याला दमदाटी करण्यात येते. काही ट्रकचालकांनी या पिळवणुकीबाबत मनपाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, अधिकार्‍यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवून ठेकेदार संस्थेला पाठबळ दिले आहे. विशेष म्हणजे ठेका घेऊन अवघा एकच महिना झाला असताना ठेकेदार संस्थेने सुरू केलेल्या पठाणी वसुलीकडे मनपाचे अधिकारी व पदाधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.

मॅक्स लिंकशी करारनामा करताना प्रत्येक पारगमन नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अट घाला, अशी मागणी उपमहापौर गीतांजली काळे यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून मॅक्स लिंकला सूट दिली आहे. नियमाप्रमाणेच पारगमन वसूल करणार, असे आश्वासन मॅक्स लिंकच्या संचालकांनी करारनामा करताना दिले होते. मात्र, बाजारातील मंदीमुळे नाक्यावरील वाहनांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ठेक्यासाठी दिलेले 21 कोटी वसूल होतात की नाही, अशी चिंता ठेकेदार संस्थेला आहे. त्यामुळे एक महिना उलटताच ट्रकचालकांची लूट सुरू झाली आहे. जवळपास सर्वच ट्रकचालक परराज्यांतील असल्याने त्यांना नाइलाजाने नाक्यावरील कर्मचार्‍यांची मनमानी सहन करावी लागत आहे.

आणि ट्रक सोडला..
फेब्रुवारीला दुपारी तामिळनाडूच्या ट्रकचालकाकडे औरंगाबाद नाक्यावर जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली. त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्याने कर्मचार्‍यांनी त्याचा ट्रक अडवून ठेवला. शेवटी या चालकाने तोफखाना पोलिस ठाणे गाठून एका कॉन्स्टेबलला झाला प्रकार सांगितला. औरंगाबाद नाका एमआयडीसी हद्दीत असल्याने ट्रकचालकाची तक्रार घेण्यात आली नाही. शेवटी संबंधित कॉन्स्टेबलने ट्रकचालकाबरोबर दोन पोलिस पाठवल्यानंतर ट्रक सोडण्यात आला.

पारगमन अधिकारी नावालाच..
महापालिका हद्दीत 15 पारगमन नाके आहेत. प्रत्येक नाक्यावर मनपाने एका पर्यवेक्षकाची नेमणूक केली आहे. मात्र, ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांबरोबर मिलीभगत असल्याने अनेक पर्यवेक्षक मनपासाठी नाही, तर ठेकेदारासाठी काम करतात. पारगमन अधिकारी म्हणून अशोक साबळे यांची नेमणूक आहे. मात्र, त्यांना नाक्यावर काय चालते याच्याशी काही देणे-घेणे नाही. नाक्यावरील पिळवणुकीबाबत अनेक ट्रकचालक, तसेच विविध संघटनांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत.

आम्ही तक्रार कोणाकडे करायची?
नियमाप्रमाणे माझ्या ट्रकमधील मालाचे पारगमन शुल्क केवळ 60 रुपये होते. मात्र, औरंगाबाद नाक्यावरील कर्मचार्‍यांनी दमदाटी करीत माझ्याकडून 250 रुपये घेतले. एवढे पैसे कसे घेता, अशी विचारणा केली तर मारहाण करण्याची धमकी दिली. नगर शहरात कोणी ओळखीचे नाही. त्यामुळे तक्रार कशी व कोणाकडे करणार?
-मुथ्थु, ट्रकचालक, तामिळनाडू.

पारगमन पावतीचे रकाने कोरेच..
"नियमापेक्षा जास्त वसुली हे नेहमीचेच झाले आहे. पावती कोरीच असते. नाक्यावरील सर्वच कर्मचारी पावती पुस्तक घेऊन फिरतात. त्यामुळे कधी-कधी दोन पावत्यांचेही पैसे मोजावे लागतात. रोज हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने नाक्यावरील कर्मचार्‍यांची मनमानी सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. ’’
-लखमंदर सिंग, ट्रकचालक, दिल्ली.

खाने के पैसे भी छिन लिये..
"औरंगाबाद रस्त्यावरील नाक्यावर पारगमन पावती घेण्यासाठी थांबलो. पावती घेतल्यानंतर पुढे एखाद्या ढाब्यावर थांबून जेवण करणार होतो. मात्र, कर्मचार्‍यांनी दमदाटी करून ‘खाने के पैसे भी छीन लिये..’ त्यामुळे आता गाडीत प्रवासी घेऊन जेवणापुरते तरी पैसे जमवावे लागतील.’’
-जरनलसिंग, ट्रकचालक, पंजाब.