आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ethanol Production Will Helps Village Development

इथेनॉल निर्मितीने ग्रामीण भागाचा विकास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सहा लाख कोटींचे इंधन अन्य देशांतून दरवर्षी आणावे लागते. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती केल्यास इंधनाची आयात कमी होऊन परदेशात जाणाऱ्या या पैशांतून ग्रामीण भागाचा कायापालट होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.

खासदार दिलीप गांधी यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक संकुलाच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खासदार गांधी, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सचवि श्याम जाजू, आमदार राम शिंदे व शविाजी कर्डिले, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी सरचिटणीस सुनील रामदासी, नगरसेवक श्रीपाद छिंदम, वीणा बोज्जा, सुवेंद्र गांधी, नितीन शेलार, महिला आघाडीप्रमुख सुरेखा विद्ये आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ई-हायवे तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. येणारे शतक हे माहिती क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे. इथेनॉलवरील देशातील पहिली बससेवा २२ आॅगस्टपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. भारताला ६ लाख कोटींचे इंधन परदेशातून आणावे लागते. साखर कारखाने, सहकारी संस्था यांनी, जर इथेनॉलची निर्मिती केली, तर इंधनावर खर्च होणारे हे पैसे ग्रामीण भागात जातील. त्यातून ग्रामीण भागाचा कायापालट होईल. भारताने २ लाख कोटींचे इथेनॉल तयार केले, तरी देशाचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, हातमागावर तयार होणाऱ्या नगरच्या साड्यांना चांगली मागणी असते. मात्र, काळाच्या ओघात हा व्यवसाय मागे पडला. या व्यवसायाला चांगले दविस आले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथील सभेत वस्त्रोद्योगाबाबत चिंता व्यक्त केली होती. या भागातही हा व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी व्यवसायात बदल करणे गरजेचे आहे. बदल केला नाही, तर व्यवसाय टिकणार नाही. या व्यवसायाला चांगले दविस येण्यासाठी, तसेच यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

विडी कामगारांसाठी घरकुल योजना
विडी व तंबाखू उद्योगावर अवलंबून असणाऱ्या मजुरांच्या रोजगाराचे संकट उभे राहिले आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, विडी कामगारांसाठी अनेक योजना आहेत. गृहनिर्माण योजनेंतर्गत मजुरांना घरे मिळतात. तथापि, इंदिरा आवास योजनेत ७० हजार रुपयांत घर बांधणे शक्य नाही. खासदार गांधी यांनी विडी कामगारांसाठी घरकुल योजनेचा प्रस्ताव दिल्यास तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू.

तंत्रज्ञानात मोठी ताकद
एकविसावे शतक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. जग भारतीय युवकांकडे सन्मानाने पहात आहे. भारतीय युवक सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठे काम करत आहेत. बायोटेक्नोलॉजीचा वापर केल्यास शेती व औषध क्षेत्रातील उत्पादन दोन ते तीन पटीने वाढेल, असे गडकरी म्हणाले. शिक्षण ही काळाची गरज आहे. एकेकाळी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता शिक्षण क्षेत्रात सुविधा वाढत असून, या सुविधा अजून वाढल्या पाहिजेत. तांत्रिक शिक्षण मिळाले पाहिजे. तंत्रज्ञान ही मोठी ताकद आहे. ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणाचा आधार घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.टेक्स्टाईल पार्क योजनेत नगरचा समावेश करावा, अशी मागणी खासदार गांधी यांनी यावेळी केली.
पत्रकार नको रे बाबा...
पूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रभर दौरा करत असताना गडकरी प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेत असत. पत्रकारांशी संवाद साधल्याशिवाय ते पुढे जात नसत. गडकरी जेथे जायचे, तेथे कार्यकर्त्यांचा पहिला निरोप असे तो पत्रकार परिषदेचा. सोमवारी गडकरी यांच्या उपस्थितीत तीन कार्यक्रम झाले. नेप्ती नाका येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी गडकरी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नको म्हणून गडकरी पुढे गेले. भाळवणी येथील कार्यक्रमानंतरही पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काहीच न बोलता निघून गेले.

फोटो - पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक संकुल भवनाच्या भूमिप्रसंगी बोलताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी.