आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर साध्य करा जीवनध्येय : अरुणिमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साखळी चोरांचा प्रतिकार केला, म्हणून त्यांनी मला चालत्या रेल्वेतून फेकले. पाय तुटलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत मी सात तास अंधारात रेल्वेट्रॅकवर पडून होते. या दुर्घटनेतून वाचल्यानंतर मी ठरवले आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान स्वीकारायचे. कृत्रिम पाय बसवल्यानंतर मी एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहू लागले. दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या दोन वर्षांत मी एव्हरेस्टचा माथा गाठला, असे अरुणिमा सिन्हा हिने सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

अरुणिमा लवकरच ऑस्ट्रेलियातील कोईझस्को शिखर सर करण्यासाठी रवाना होणार आहे. या मोहिमेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते भारताचा तिरंगा तिच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. यावेळी सर्वांनी उभे राहून अरुणिमाला मानवंदना दिली. "देश की नारी कैसी हो, अरुणिमा जैसी हो' अशा घोषणा देत टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

स्नेहालयात आयोजित युवा प्रेरणा शिबिराचे उदघाटन मंगळवारी असे आगळ्यावेगळ्या प्रकारे झाले. सुवालाल शिंगवी, कॅप्टन विठ्ठल सोसे, डॉ. शशी धर्माधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
आयुष्यात येणारी मोठ्यातली मोठी अडचण ही सुवर्णसंधी मानून हे आव्हान स्वीकारा, असे सांगत अरुणिमाने तिची यशोगाथा उलगडली. रेल्वेतील त्या दुर्घटनेनंतर अनेक बरे-वाईट अनुभव आले. "तिकीट नव्हते, म्हणून अरुणिमाने चालत्या गाडीतून उडी मारली,' असे काही वृत्तपत्रांनी छापले. माझ्या घरच्यांनी त्याचा खुलासा करताच अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला, अशा बातम्या छापल्या जाऊ लागल्या. महिनाभर रुग्णालयात होते, तेव्हाच ठरवले, आज तुम्ही बाेलत आहात,
पण एक दिवस माझा येईल...

एक कृत्रिम पाय आणि दुसऱ्या पायात स्टील रॉड बसवलेली मी जेव्हा गिर्यारोहण शिकू लागले, तेव्हा माझ्यासह घरच्यांना वेडं ठरवलं गेेलं. आधीच लंगडी, आता हिचं डोकंही फिरलेलं दिसतं, अशी हेटाळणी केली गेली. पण जिद्दीने मी पुढे जात राहिले. पहिली महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल यांच्याकडे मी शिकण्यासाठी गेले, तेव्हा त्या म्हणाल्या, खरंतर तुझ्यातलं एव्हरेस्ट तू आधीच सर केलं आहे. आता लोकांसाठी तुला ही कामगिरी करायची आहे...

प्रत्यक्ष शिखर सर करताना खूप अडचणी आल्या. अनेकदा पाय रक्तबंबाळ व्हायचा, असह्य वेदना व्हायच्या. पण कोणतीही किंमत देऊन मला माझं ध्येय साध्य करायचं होतं. वर जाताना काही गिर्यारोहकांचे बर्फात गाडले गेलेले मृतदेह दिसत होते. त्यांचं अपूर्ण राहिलेले एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करूया असं ठरवून मी चालत राहिले. शेवटच्या टप्प्यात ऑक्सिजन संपत आला, पण त्याची तमा न बाळगता मी शिखर सर केले, असे अरुणिमाने सांगितले.
डॉ. धर्माधिकारी, अलका मेहता, मेधा देशमुख, डॉ. संग्राम पाटील, जयंत हरी कुलकर्णी, उमेश घेवरीकर, दत्तात्रेय गडगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित क्षीरसागर यांनी केले, तर आभार श्याम आसावा यांनी मानले.

देशाची, समाजाची सेवा करा...
पैसा हे जीवनाचे ध्येय असू शकत नाही. पैसा हे चरितार्थाचे साधन आहे. तथापि, अनेकजण पैशाच्या मागे धावत जीवन वाया घालवतात. जग जिंकणारा सिकंदरही रिकाम्या हाताने वर गेला, असे हजारे यांनी सांगितले. मी देशासाठी, समाजासाठी काही करेन, अशी प्रतिज्ञा करा. आनंदी जीवन जगायचे असेल, तर इतरांना आनंदी करा, असा सल्लाही त्यांनी दिला.