आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - राजकारणाचा अनुभव पाठीशी नसताना अडीच वर्षे महापौरपद सांभाळले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण शहर विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिले. आता महापालिकेत नसले तरी शहरासाठी अजून खूप काही करायचं आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला संघटन असो की, शहराचे विविध प्रश्न सोडवणे, माझे काम सुरूच राहील, असे मावळत्या महापौर शीला शिंदे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
पहिलीच निवडणूक, महापौरपदाची मोठी जबाबदारी यामुळे सुरुवातीला गोंधळून गेलेल्या महापौर शीला शिंदे यांचा कार्यकाळ उल्लेखनीय ठरला. ‘चूल व मूल’ यापलीकडे जाऊन महिला काय करू शकते हे त्यांनी दाखवून दिले. महापौरपदाचा कार्यभार घेतला त्या वेळी बोलण्यास घाबरणार्या शिंदे यांनी नंतर आपल्या भाषणांतून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. आणखी आठ दिवसांनी त्या महापौरपदावरून पायउतार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने त्यांची पुढील वाटचाल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शिंदे म्हणाल्या, महापालिकेत नसले म्हणून काय झाले? अडीच वर्षांत शहराशी नाळ जुळली आहे. त्यामुळे यापुढे शहर विकासाचे कार्य सुरूच ठेवणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन मी उभारणार आहे.
या वेळी महापालिकेची निवडणूक का लढवली नाही, असा प्रश्न मला नागरिक विचारतात. माझे पती अनिल शिंदे गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांनीच निवडणूक लढवणे योग्य होते, असे महापौर शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.