आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्र्याला ट्रेझरीने ठरवले मृत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर (जि. नगर) - सरकारी बाबूंच्या लालफीतशाही कारभाराचा फटका चक्क राज्याच्या एका माजी मंत्र्याला बसला आहे. कानोकानी खबरीवरून या मंत्र्याला मृत ठरवत नगरच्या कोशागार कार्यालयाने (ट्रेझरी) चार महिन्यांपासून त्यांचे निवृत्तिवेतनच बंद केले आहे. प्रशासनाच्या या गलथानपणाचा बळी ठरलेले माजी मंत्री बी. जे. खताळ यांनीच बुधवारी ही माहिती सांगितली.
माजी विधानसभा सदस्य म्हणून खताळ यांना 1988 पासून शासनाकडून दरमहा निवृत्तिवेतन मिळते. डिसेंबर 2013मध्ये त्यांनी नियमाप्रमाणे हयातीचा दाखला सादर केला. चार महिन्यांपूर्वी ट्रेझरीकडे एक फोन आला आणि त्यावरून खताळ यांना मृत ठरवत या कार्यालयाने त्यांचे निवृत्तिवेतन बंद केले. बुधवारी दिवसभर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर हा सावळागोंधळ उघड झाला. खताळ यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे.

..निदान मृत्यूची बातमी आली असती
संबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर नगरच्या ट्रेझरी कार्यालयाने मी मृत झाल्याची माहिती दिली. मी जर मृत झालो असतो, तर माझ्या मृत्यूची किमान वर्तमानपत्रात बातमी तरी आली असती.’ बी. जे. खताळ, माजी मंत्री अर्चना खताळ असे नाव सांगणार्‍या महिलेने ट्रेझरीत फोन करून आपले वडील खताळ मृत झाल्याची माहिती दिली होती. त्याच्या आधारे खताळ यांची पेन्शन बंद झाली. प्रत्यक्षात बी. जे. खताळ यांना अर्चना नावाची मुलगीच नाही. केवळ फोनवर मिळालेल्या माहितीवर अधिकार्‍यांनी विश्वास ठेवला. हयात असणार्‍या व्यक्तींना हयातीचे दाखले, कागदपत्रांची पूर्तता करायला लावणार्‍या ट्रेझरीला वेतन बंद करण्यासाठी त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याची गरज भासली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

खताळ यांनी गांधींजींच्या चले जाव आंदोलनात भाग घेतला होता. 1969 मध्ये केंद्र सरकारने नियोजन खात्याची निर्मिती केली. तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात खताळ राज्याचे पहिले नियोजनमंत्री झाले. अनेक धरणे, तसेच शेतकरी, कष्टकरी हिताच्या योजना त्यांच्या काळात मार्गी लागल्या. वयाची 95 वर्षे उलटली असताना आजही अनेक कार्यक्रमांत ते परखड विचार मांडत असतात.
(फोटो - माजी मंत्री, बी. जे. खताळ)