आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी तयारीला लागा, माजी आमदार राजळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - आगामी चार-पाच महिन्यांत कुठल्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासून प्रचारासाठी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार राजीव राजळे यांनी केले.

हरिहरेश्वर (ता. पाथर्डी) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राजळे बोलत होते. अध्यक्षस्थानी हरिहरेश्वर देवस्थानचे मठाधिपती गणपत महाराज होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, सुनंदा वाघ, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष दीपाली बंग, पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब किलबिले, शिवाजीराव हाडोळे, छावा संघटनेचे प्रांताधिकारी प्रा. चंद्रकांत भराट, सुधाकर भवर, संदीप पठाडे, बशीर शेख यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्यात मोनिका राजळे यांची पेढेतुला करण्यात आली. राजीव राजळे म्हणाले, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ हा आपला हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य आपल्याला निश्चित मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या काळात आव्हाणे येथे आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत एकच मेळावा घेण्यात येईल. घुले यांनी आमच्या दिल्ली भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. आजची सभा हीच लोकसभेची सभा आहे, असे गृहीत धरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मुलीच्या विवाहात ज्याप्रकारे आपण वरपिता म्हणून राबतो, त्याचप्रकारे आता या निवडणुकीतही राबा, असे आवाहन त्यांनी केले.

राजळे पुढे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली त्यानुसारच आपण काम करत आहोत. आपल्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते असल्यानेच आपण जिल्ह्याच्या राजकारणात टिकून आहोत. लोकसभा निवडणूक काळात आमदार चंद्रशेखर घुले दुखावतील असे वागू नका. कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून कामाला लागावे. शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून विक्रमी मते घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक बंडू पठाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले. आभार मधुकर देशमुख यांनी मानले.

पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब किलबिले यांचा राजीव राजळे व मोनिका राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी कोरडगाव, तोंडोळी, सोनोशी, कोनोशी यासह अन्य परिसरातून मोठय़ा प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते.