आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex speaker Of Legislative Council Of Maharastra N S Pharande In Angar

निष्ठावंत कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे स्तंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - निष्ठावंत कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे स्तंभ असतात. स्तंभ असतो म्हणूनच कळस असतो. कुठलाही कळस स्तंभावर आधारित असतो. त्यामुळे स्तंभांची सतत जाणीव ठेवून त्याला शक्ती देण्याचे काम सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. ना. सं. फरांदे यांनी रविवारी केले.

भारतीय जनता पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या सत्कारप्रसंगी फरांदे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी या वेळी उपस्थित होते.

फरांदे म्हणाले, हल्ली राजकारणात हात कमी व तोंड अधिक चालते. पदभार सांभाळणे ही मोठी जबाबदारी असते. कुठलेही पद सांभाळताना कृती महत्त्वाची असते. अन्य पदाधिकार्‍यांनीही आगरकरांच्या कामात लक्ष घालावे.

खासदार गांधी म्हणाले, महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले याचा सर्वाधिक आनंद भाजपला झाला. कारण भाजपच्या सर्व नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित आहेत. निवडणुकीत आगरकरांनी सर्वांना बरोबर घ्यावे. कुणाच्याही ताकदीला कमी लेखू नये. कार्यकर्ते हीच पक्षाची शक्ती आहे. त्यांचा मान-सन्मान वाढला पाहिजे. युती सन्मानपूर्वक करायची असते.

आमदार शिंदे म्हणाले, आता संघटनात्मक बांधणीसाठी लक्ष देण्याची गरज आहे. मनपा निवडणुकीला सामोरे जाताना सर्वांनी एकत्र यावे.

सत्काराला उत्तर देताना आगरकर म्हणाले, कार्यकर्ते हीच भाजपची खरी संपत्ती आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवण्याचे काम आपण करू. कार्यकारिणी तयार करताना जातीचा, धर्माचा विचार न करता सामाजिक निकष लावण्यात येतील. पक्षात कुठल्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.

पत्रकार परिषदेत आगरकर म्हणाले, मनपा निवडणूक सेना-भाजप एकत्रित लढवणार आहे. युती तोडण्याची भाषा आम्ही करणार नाही. 50-50 याप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे. कुठल्याही प्रकारची असमानता आम्हाला मान्य नाही. समान जागावाटप न झाल्यास निवडणूक स्वबळावर लढवायची का, याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल.

माजी नगरसेवक संदीप कोतकर भाजपमध्ये येणार असल्याबद्दल विचारले असता आगरकर म्हणाले, तशा बातम्या मी वृत्तपत्रांत वाचल्या. ते येणार किंवा नाही याबाबत मला काहीच माहिती नाही.

आसारामबापू यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना प्रा. फरांदे म्हणाले, ही गोष्ट खरी असेल, तर आपल्याला तोंडात मारून घ्यावे लागेल..